सातपूरमधील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस….तलवारीने मारहाण करणारे संशयित गुन्हे शाखा युनिट-२ कडून जेरबंद….
नाशिक घरात घुसून तलवारीने व लाकडी दांड्याने मारहाण करत दहशत माजवून जबरी चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला नाशिक शहराच्या गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेला जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, चेतन मच्छिंद्र पवार (वय ३०, रा. गंगापूरगाव, गोवर्धन शाळेजवळ, नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
घरात घुसून केली होती तोडफोड आणि मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे २०२६ रोजी रात्री १०:१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व तिचे पती घरी असताना ही घटना घडली होती. फिर्यादीच्या पतीने त्यांच्या एका मित्राला रुग्णालयात दाखल केल्याचा राग मनात धरून संशयित आरोपी चेतन पवार आणि त्याच्या इतर साथीदारांनी फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. त्यांनी आपल्या जवळील धारदार तलवार आणि लाकडी दांडे बाहेर काढून फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ व बेदम मारहाण केली.
एवढ्यावरच न थांबता, घरात मोठी दहशत निर्माण व्हावी या उद्देशाने आरोपींनी घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून मोठे नुकसान केले. तसेच घरातील सीसीटीव्ही कॅमेरा बळजबरीने तोडून चोरून नेला होता. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. ४८४/२०२६) भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), १२५, ३५२, ३५१(२), ३२४(४)(५), ३(५) सह क्रिमिनल अमेडमेंट लॉ ॲक्ट कलम ३, ७ अन्वये दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट-२ चे अधिकारी आणि अंमलदार करत होते. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणावरून पोलिसांना संशयित निष्पन्न करण्यात यश आले. दरम्यान, युनिट-२ चे पोलीस अंमलदार महेश खांडबहाले आणि तेजस मते यांना त्यांच्या खात्रीशीर गुप्तहेरामार्फत माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील मुख्य संशयित चेतन पवार हा गंगापूर गाव आणि गोवर्धन नगर भागात फिरत आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गंगापूर गाव आणि गोवर्धन शाळेजवळ सापळा रचला. संशयित चेतन पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्याला सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही धडक कामगिरी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत गुन्हे शाखा युनिट-२ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, मनोहर शिंदे, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, महेश खांडबहाले, तेजस मते आणि प्रविण वानखेडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.






