ताज्या बातम्या महाराष्ट्र

हातावरील गोंदणावरून लागला मुंबईच्या बालकाचा शोध…नाशिक रोड आरपीएफची तत्पर कारवाई…

हातावरील गोंदणावरून लागला मुंबईच्या बालकाचा शोध…नाशिक रोड आरपीएफची तत्पर कारवाई…

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहिमेअंतर्गत नाशिक रोड रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कौतुकास्पद कामगिरी करत घरातून निघून आलेल्या एका ९ वर्षीय बालकाला सुरक्षित वाचवले आहे. बालकाच्या हातावर गोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या पालकांचा शोध घेण्यात आरपीएफला यश आले.

दिनांक ११ नोव्हेंबर २०२६ रोजी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर कर्तव्य बजावत असताना आरक्षक संदीप खटना यांना गाडी क्रमांक ११००१ डाउन नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये एक अल्पवयीन मुलगा एकटाच फिरताना आढळला. त्याच्यासोबत कोणीही पालक किंवा नातेवाईक नसल्याचे लक्षात येताच, खटना यांनी त्याला तात्काळ आरपीएफ पोस्टमध्ये आणले आणि चाइल्ड लाईनच्या सदस्या प्रणिता तपकिरे यांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच जिल्हा चाइल्ड लाईनचे सदस्य निखिल पाटील आरपीएफ पोस्टमध्ये दाखल झाले. उपनिरीक्षक दिलीप कुमार यांच्या उपस्थितीत मुलाची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव रुद्रा आणि वय ९ वर्षे असल्याचे सांगितले; मात्र त्याला घराचा पत्ता सांगता येत नव्हता. दरम्यान, जवानांचे लक्ष त्याच्या उजव्या हातावर गेले. हातावर ‘रुद्रा’ हे नाव आणि एक मोबाईल क्रमांक गोंदवलेला (टॅटू) होता.
आरपीएफ जवानांनी प्रसंगावधान राखत त्या क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरून धारावी, मुंबई येथील रहिवासी शंकर राम बचन जायसवाल यांनी फोन उचलला. हा मुलगा आपलाच असून तो कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.

बालकाच्या वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांच्या संमतीने मुलाला पुढील सुरक्षिततेसाठी नाशिक येथील ऊंटवाडी परिसरातील बाल कल्याण समितीकडे (CWC) सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार चाइल्ड लाईनचे निखिल पाटील व आरक्षक योगेश गवाड यांनी बालकाची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षितपणे समितीच्या ताब्यात दिले. आरपीएफच्या या तत्परतेबद्दल बालकाच्या कुटुंबीयांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.

रेल्वे प्रशासनाचे आवाहन

रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वेगाडीत कोणतेही अल्पवयीन बालक एकटे, निराधार अथवा संशयास्पद स्थितीत आढळल्यास प्रवाशांनी तात्काळ जवळच्या आरपीएफ किंवा जीआरपी कर्मचाऱ्यांना कळवावे, असे आवाहन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *