जिल्हाधिकाऱ्यांसोबत फुलला आधाराश्रमातील चिमुकल्यांचा आनंद…परदेशी दाम्पत्याने घेतले बालकाला दत्तक…
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत दत्तक जागृती पुस्तिकेचे प्रकाशन; मुलांसोबत दिवाळी साजरी करत केली आर्थिक मदत..
नाशिक. दिवाळीचा सण म्हणजे आनंद, आपुलकी आणि मायेची देवाणघेवाण. याच सामाजिक भावनेतून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाशिक येथील आधाराश्रमाला भेट देत अनाथ बालकांसमवेत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आधाराश्रमातील एका चिमुकल्याला अमेरिकेतील (यूएसए) परदेशी दाम्पत्याने दत्तक घेतले. या निरागस बालकाला प्रेमळ कुटुंबाचा आणि मायेचा आधार मिळाल्याने या दिवाळी भेटीला एक भावनिक किनार लाभली.
दत्तक प्रक्रियेबाबत जनजागृतीसाठी पुस्तिकेचे प्रकाशन
देशभरात नोव्हेंबर हा महिना ‘दत्तक जागृती महिना’ म्हणून साजरा केला जातो. या औचित्यावर आधाराश्रमात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेने तयार केलेल्या दत्तकविषयक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते झाले. समाजात दत्तक प्रक्रियेबाबत जनजागृती व्हावी आणि जास्तीत जास्त अनाथ बालकांना हक्काचे कुटुंब मिळावे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.

या प्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने, संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर केळकर, सचिव हेमंत पाठक, कल्याणी दातार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात दत्तक घेतलेल्या बालकाचा फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यास संमती देणारे दत्तक पालक अजय व वृषाली मोरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
‘क्यूआर कोड’द्वारे निधी संकलनाची संकल्पना
संस्थेचे कामकाज अधिक सक्षमपणे चालविण्यासाठी लोकसहभागातून निधी संकलन होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यासाठी शहरातील विविध भागांत ‘क्यूआर कोड’ (QR Code) लावून देणगी संकलित करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी मांडली. समाजाला आर्थिक योगदानाचे आवाहन करतानाच, त्यांनी स्वतः संस्थेला आर्थिक देणगी देत या निधी संकलन उपक्रमाची सुरुवात केली.
संस्थेतील प्रत्येक बालकाचे किमान पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेच पाहिजे. त्यासाठी मुलांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) आणि नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी बालकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना फराळाचे वाटप केले. तसेच, मुलांनी तयार केलेल्या आकाशकंदील, पणत्या आणि शोभेच्या वस्तूंचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह हेमंत पाठक यांनी केले, तर अध्यक्ष प्रभाकर केळकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.






