नाशिकमध्ये निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; शहरात खळबळ….
नाशिक: नाशिक शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवृत्त सहाय्यक मोटार परिवहन (RTO) अधिकारी हेमंत गोविंद हेमाडे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सिटी सेंटर मॉल परिसरातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असून, या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हेमंत गोविंद हेमाडे हे मोटार परिवहन विभागातून (RTO) सहाय्यक अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. ते शहरातील सिटी सेंटर मॉल परिसरात वास्तव्यास होते. राहत्या घरातच त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.
हेमंत हेमाडे यांनी कौटुंबिक कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून सखोल आणि अधिकचा तपास सुरू असून, तपासानंतरच आत्महत्येचे नेमके कारण समोर येणार आहे.






