गुंडा विरोधी पथकाची मोठी कारवाई …दोन सराईत गुन्हेगारांकडून ३ गावठी कट्टे आणि ३ जिवंत काडतुसे जप्त… मध्य प्रदेशातून आणले होते हत्यार…

नाशिक शहरात अवैध हत्यारे बाळगणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात नाशिक शहर पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्व्ये गुंडा विरोधी पथकाने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून ३ गावठी कट्टे आणि ३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, हे हत्यार विक्रीसाठी थेट मध्य प्रदेशातून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शहरातील पंचवटी आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास गुंडा विरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता. गुन्ह्यातील ‘बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज’ शोधण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.
पंचवटी पोलीस ठाण्यातील आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या कुणाल मच्छिंद्र चव्हाण (रा. पंचवटी) याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्याने हा गावठी कट्टा भावेश मिलिंद जोशी (वय २६, रा. आडगाव, नाशिक, मूळ रा. धुळे) याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून भावेश जोशी याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत पोलिसांनी २ गावठी कट्टे आणि २ जिवंत काडतुसे जप्त केली.
नाशिकरोड पोलीस ठाण्यातील अशाच एका गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आदिल जमील सय्यद (रा. नाशिकरोड) याच्या चौकशीतून दुसऱ्या आरोपीचा सुगावा लागला. त्याने हा कट्टा विविध गुन्ह्यात फरार असलेला आरोपी
प्रथमेश उर्फ मोठ्या नेल्सन कसबे (वय २४, रा. पवारवाडी, नाशिकरोड) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी शोध मोहीम राबवून प्रथमेश कसबे याला बेड्या ठोकल्या आणि त्याच्याकडून १ गावठी कट्टा व १ जिवंत काडतूस हस्तगत केले.
पोलिसांनी अटक केलेले दोन्ही आरोपी भावेश मिलिंद जोशी आणि प्रथमेश उर्फ मोठ्या कसबे यांनी हे गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे मध्य प्रदेशातील ‘उमर्टी’ येथून विक्रीच्या उद्देशाने नाशिकमध्ये आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
या आंतरराज्य टोळीचे आणखी काही धागेदोरे हाती लागतात का, यादृष्टीने गुंडा विरोधी पथक पुढील तपास करत आहे.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपआयुक्त (गुन्हे)
किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवादार विजय सूर्यवंशी, प्रदिप ठाकरे, सुनिल आडके, पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे, महिला पोलीस अंमलदार सुनिता कवडे तसेच गुन्हे शाखा नाशिकरोड युनिटचे पोलीस हवादार अविनाश देवरे, मंगेष जगताप, विशाल कुवर आणि अजय देशमुख यांच्या पथकाने केली.





