ताज्या बातम्या नाशिक

अस्वच्छतेमुळे नाशिकमधील ५ हॉटेल्स आणि कॅफेंवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई…परवाने तात्काळ निलंबित…

अस्वच्छतेमुळे नाशिकमधील ५ हॉटेल्स आणि कॅफेंवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई…परवाने तात्काळ निलंबित…

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिक शहरातील अन्न आस्थापनांवर धडक कारवाई करत एकाच दिवसात ४ हॉटेल्सचे परवाने आणि १ कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र तात्काळ निलंबित केले आहे. अन्न सुरक्षा व मानके नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छ परिस्थिती आढळून आल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे, सह आयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त (अन्न) विनोद पवार व ज्ञानेश्वर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी शहरातील विविध भागांतील अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

या तपासणीत नियमांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने तात्काळ निलंबनाचे आदेश जारी केले.

कारवाई करण्यात आलेली आस्थापने:

परवाना निलंबित झालेली ४ हॉटेल्स:

१. मे. हॉटेल विहार (मुक्ताई टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक)
२. मे. हॉटेल श्यामसुंदर (सी रोड, एमआयडीसी, सातपूर, नाशिक)
३. मे. हॉटेल तुषार मिस्ळ (आकाशी चेंबर्ससमोर, भोसला स्टॉप, कॉलेज रोड, नाशिक)
४. मे. हॉटेल महाराजा काठियावाडी (आडगाव फाटा, आडगाव शिवार, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक)
नोंदणी प्रमाणपत्र निलंबित झालेला १ कॅफे:
५. मे. केके दुर्गा कॅफे (स्टुडंट बिझनेस सेंटर, कृषीनगर, कॉलेज रोड, नाशिक)
कारवाईची प्रमुख कारणे:
तपासणीदरम्यान या सर्व आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व मानके नियम, २०११ मधील ‘अनुसूची-४’ (Schedule-4) मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे समोर आले.

यामध्ये प्रामुख्याने खालील गंभीर त्रुटी आढळल्या:

स्वयंपाकघर आणि अन्न तयार करण्याच्या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ परिस्थिती.

अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक व उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव (उदा. हॉटेल विहार) आणि कीटक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव.

कच्चा व शिजवलेला अन्नपदार्थ अस्वच्छ परिस्थितीत साठवणे व स्टोअर रूमची दुरवस्था.

स्वयंपाकघराची अपुरी जागा आणि निर्धारित रचना व बांधकामविषयक अटींचे उल्लंघन.

बिलावर FSSAI परवाना क्रमांक नमूद नसणे आणि मेनू कार्डवर वापरल्या जाणाऱ्या तेलाचा/माध्यमाचा (Cooking Medium) उल्लेख नसणे (केके दुर्गा कॅफे).

मुदतबाह्य (Expired) अन्नपदार्थांचा साठा आढळून येणे (हॉटेल तुषार मिस्ळ).
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अश्विनी पाटील, श्रीमती अनुजा नसले, प्रतीक भट, किशोर बांदगुडे आणि संकेत देशमाने यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

प्रशासनाचे आवाहन:

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा सुरक्षिततेबाबत काही संशय असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, तसेच सर्व व्यावसायिकांनी कायद्याचे काटेकोर पालन करूनच व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागामार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *