नाशिकरोड येथे ‘ईद-ए-मिलाद’च्या मिरवणुकीत यंदा डीजे वाजणार नाही; शांतता समितीच्या बैठकीत सर्वानुमते महत्त्वपूर्ण निर्णय…
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) नाशिकरोड येथे काढण्यात येणाऱ्या पारंपरिक जुलूस (मिरवणुकीत) यंदा डीजे वाजवला जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण आणि आदर्श निर्णय नाशिकरोड जुलूस कमिटीच्या वतीने घेण्यात आला आहे. या सामाजिक व शांतताप्रिय निर्णयाचे सर्व स्तरांतून मोठे स्वागत होत आहे.

येत्या २६ ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद सण साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्यासाठी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पोलीस प्रशासन, महापालिका अधिकारी आणि जुलूस कमिटीची संयुक्त बैठक पार पडली.
मिरवणुकीत डीजेचा वापर पूर्णपणे टाळला जाईल
विनापरवाना रथ व आकाराने मोठे झेंडे वापरण्यास बंदी राहील.
कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह होर्डिंग्स लावले जाणार नाहीत.
मिरवणूक मार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही आणि कोणतीही प्रक्षोभक घोषणाबाजी केली जाणार नाही.
मिरवणुकीची सुरुवात गोसावी वाडी येथील टायटॅनिक पॉईंट येथून होईल, तर सांगता देवळाली गावातील गाडेकर मैदानावर केली जाईल.
अंमलबजावणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून नाशिकरोड भागातील विविध मशिदींमधून मौलानांनी विशेष प्रबोधन केले आहे. मिरवणुकीत डीजे न वाजवणे, ध्वनीप्रदूषणाचे दुष्परिणाम टाळणे तसेच तरुणांनी उत्साहाच्या भरात कोणतीही अनुचित कृती अथवा घोषणाबाजी करू नये, याबाबत सातत्याने मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीस सहायक पोलीस आयुक्त अद्विती शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बडेसाब नाईकवाडे, महापालिकेचे सहायक अधीक्षक कैलास अहिरे, विद्युत अभियंता राहुल पवार, विभागीय स्वच्छता निरीक्षक विजय मोरे, कैलास वर्पे, अनंत वाघ, रमेश दाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण ओस्टवाल आदी उपस्थित होते.
तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने निजाम मास्टर, अस्लम मणियार, इम्तियाज हाजी, शकील सय्यद, अन्वर मणियार, सलीम शेख, निसार सय्यद, आरिफ शेख, वसीम शेख, मोहसिन खान, शाहरुख शेख, शमान शेख, साहिल बागवान, अमजद शेख, सिकंदर पठाण, शाहिद शेख, अझीम खान, फारुक शेख, आझाद शेख, अरबाज खान, मुज्जू खान यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.







