क्राईम ताज्या बातम्या

नाशिक शहर पोलिसांची कामगिरी…. मुंबईतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून सुटका.. विवाहित आरोपी अटकेत…

नाशिक शहर पोलिसांची कामगिरी…. मुंबईतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून सुटका.. विवाहित आरोपी अटकेत…

मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या एका अल्पवयीन मुलीची नाशिक शहर गुन्हे शाखा अंबड (युनिट-३) पथकाने नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातून सुटका केली आहे. याप्रकरणी ३४ वर्षीय विवाहित आरोपीला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा (भा.न्या.सं. कलम १३७(२) प्रमाणे) दाखल करण्यात आला होता. अज्ञात व्यक्तीने मुलीला कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची तक्रार तिच्या पालकांनी दिली होती.

असा लागला छडा..

नाशिक शहरचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला स्थानिक आणि इतर गुन्ह्यांचा जलद तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास सुरू असताना, गुन्हे शाखा अंबड (युनिट-३) चे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत सदर अपहृत मुलगी नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे सापळा रचला. पोलीस अंमलदार गौरव धात्रक यांनी मुलीला अचूक ओळखल्यानंतर महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने तिला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. यावेळी तिच्यासोबत असलेला आरोपी प्रशांत उर्फ ठाकरे रवि गायकवाड (वय ३४, रा. पोस्टल कॉलनी, चेंबूर, मुंबई) यालाही पोलिसांनी अटक केली.

आरोपीची धक्कादायक कबुली

पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी हा विवाहित असून त्याचे यापूर्वीच लग्न झालेले आहे. असे असतानाही त्याने या अल्पवयीन मुलीला फूस लावून व आमिष दाखवून पळवून नेले होते. अपहरणानंतर त्याने मुलीला तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश), कोल्हापूर, अक्कलकोट (सोलापूर), गाणगापूर आणि पुरी (ओरिसा) या विविध ठिकाणी फिरवले होते.
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपीला आणि पीडित मुलीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी चेंबूर पोलीस ठाण्याच्या (बृहन्मुंबई शहर) पथकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या पथकाने केली कारवाई:

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेंद्रसिंग राजपूत, पोउपनि. मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार राजेश महाले, महेंद्र दौंदे, गौरव धात्रक, चारुदत्त निकम, हर्षल जाधव, अरुण चव्हाण आणि महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *