बाल संस्कार वर्गाचे उद्धघाटन….. योगेश्वर ग्रुप फाउंडेशनचे स्तुत्य उपक्रम….
पाथर्डी-दाडेगाव येथे योगेश्वर ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या “बाल संस्कार वर्गा”चा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सुमधुर श्लोक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक शहर संघचालक माननीय विजयराव मालपाठक, शहर सहकार्यवाह रोहितजी गायधनी तसेच योगेश्वर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक कौशिक सर कोठे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमास दाडेगाव परिसरातील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

यावेळी मार्गदर्शन करताना विजयराव मालपाठक यांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. भारताची गौरवशाली परंपरा टिकवून ठेवण्यासाठी बालपणापासूनच मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
रोहितजी गायधनी यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी अशा संस्कार वर्गांची आवश्यकता असल्याचे सांगितले. आजच्या आधुनिक युगात मुलांना योग्य दिशा देण्यासाठी संस्कारक्षम वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
योगेश्वर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक कौशिक सर कोठिया यांनी आपल्या मनोगतात संस्कार वर्गाची आजची आवश्यकता अधोरेखित केली. “आज शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये, संस्कार आणि समाजभान यांची जपणूक होणे अत्यंत आवश्यक आहे. येणारी पिढी सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्राभिमानी घडावी यासाठी हा संस्कार वर्ग सुरू करण्यात आला असून, हा उपक्रम सातत्यपूर्ण आणि प्रभावीपणे चालू राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामस्थांनी देखील आपले मनोगत व्यक्त करत योगेश्वर ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हा संस्कार वर्ग अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन चंदाताई गांगुर्डे यांनी तर आभार प्रदर्शन दीपक मुंडे यांनी केले. योगेश्वर ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या संस्कार वर्गाचे सर्वत्र स्वागत व कौतुक होत असून, समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडविणारा हा उपक्रम ठरणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.






