मतदार यादीत नाव नोंदवण्याची आणखी एक संधी! ‘ASDD’ प्रवर्गातील मतदारांनी गणना प्रपत्र भरून द्यावे…जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन…प्रारूप यादीत नाव नसलेल्यांना मिळणार मोठा दिलासा….
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेदरम्यान गणना प्रपत्र भरूनही तांत्रिक किंवा इतर कारणांमुळे प्रारूप मतदार यादीतून नावे वगळल्या गेलेल्या मतदारांसाठी भारत निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. ‘ASDD’ (अनुपस्थित, स्थलांतरित, मृत व दुबार) प्रवर्गात समावेश झाल्यामुळे ज्यांची नावे प्रारूप यादीत येऊ शकली नाहीत, अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित मतदारांनी तात्काळ गणना प्रपत्र भरून देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. घरोघरी जाऊन केलेल्या सर्वेक्षणात जे मतदार अनुपस्थित (Absent), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) किंवा दुबार (Duplicate) आढळले, त्यांची नावे प्रारूप यादीतून वगळण्यात आली होती. आता अशा पात्र मतदारांना त्यांच्या सध्याच्या रहिवासाच्या ठिकाणी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे (AERO) गणना प्रपत्र सादर करता येणार आहे.
मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाची विशेष मोहीम
थेट संपर्क व डिजिटल सुविधा: संबंधित मतदारांची जुनी माहिती असलेले गणना प्रपत्र ‘ECINet’ प्रणालीवर उपलब्ध आहे. प्रशासन हे प्रपत्र प्रत्यक्ष भेटीतून किंवा व्हॉट्सॲप, ई-मेल आणि एसएमएसद्वारे मतदारांपर्यंत पोहोचवणार आहे.
ऑनलाइन डाउनलोडची सोय: मतदार स्वतः निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा ECINet प्रणालीवर आपला ‘EPIC’ (मतदार ओळखपत्र) क्रमांक टाकून गणना प्रपत्र डाउनलोड करू शकतात आणि ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने जमा करू शकतात.
यंत्रणेचा समन्वय: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी एकत्रितपणे काम करून मतदारांचे नातेवाईक, शेजारी व स्थानिक रहिवासी संघांच्या माध्यमातून या प्रक्रियेची माहिती पोहोचवणार आहेत.
कोणासाठी कोणते नियम? महत्त्वाचे मुद्दे:
स्थलांतरित न झालेले मतदार: जे मतदार आपल्या मूळ पत्त्यावरच राहत आहेत, त्यांना गणना प्रपत्रासोबत ‘जोडपत्र-ब’ जोडण्याची आवश्यकता नाही.
स्थलांतरित मतदार: जे मतदार नवीन ठिकाणी राहण्यास गेले आहेत, त्यांनी ‘जोडपत्र-ब’ मध्ये आपला नवीन पत्ता आणि नवीन विधानसभा मतदारसंघाची माहिती भरून सध्याच्या भागातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज द्यावा.
फॉर्म-६ भरलेल्यांना सूट: प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ज्यांनी नाव नोंदणीसाठी यापूर्वीच ‘फॉर्म-६’ भरला आहे, त्यांना पुन्हा गणना प्रपत्र भरण्याची गरज नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


मतदार यादीत नाव नोंदवण्याची आणखी एक संधी! ‘ASDD’ प्रवर्गातील मतदारांनी गणना प्रपत्र भरून द्यावे…जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन…प्रारूप यादीत नाव नसलेल्यांना मिळणार मोठा दिलासा….

