
दसरा-दिवाळी सणांच्या काळात फेरीवाल्यांवरील अतिक्रमण कारवाई तात्पुरती थांबवा; श्रमशक्ती हॉकर्स सेलची नाशिक महापालिकेकडे मागणी….

येत्या दसरा व दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोरगरीब हॉकर्स, फेरीवाले व टपरीधारकांवरील अतिक्रमण कारवाई तात्पुरती थांबवण्यात यावी, अशी आग्रही मागणी ‘शमशक्ती कामगार संघटना प्रणीत श्रमशक्ती हॉकर्स सेल’च्या वतीने नाशिक महानगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी मनपा अतिक्रमण विभागाच्या उपआयुक्तांना सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मनपाच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दररोज अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली जात आहे.

यामध्ये छोट्या व्यवसायिकांवरही कारवाई होत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या दसरा आणि दिवाळी हे मोठे सण जवळ आले असून नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी बाजारपेठेत येत आहेत.
वर्षभरात सणासुदीच्या काही दिवसांत होणाऱ्या व्यवसायावरच अनेक गोरगरीब फेरीवाले आणि टपरीधारकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असतो.
त्यामुळे या सणांच्या काळात कारवाई थांबवून छोट्या व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर, सणांच्या काळात ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही, पादचाऱ्यांना त्रास होणार नाही आणि सार्वजनिक रस्ते मोकळे राहतील याची काळजी घेण्याचे आवाहन संघटनेमार्फत सर्व फेरीवाल्यांना करण्यात येईल, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, जेणेकरून गोरगरीब फेरीवाल्यांनाही दसरा व दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता येईल, अशी अपेक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.




