
नाशिकरोडमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तक्रार केल्यास गल्ली जाळण्याची धमकी, गुन्हा दाखल…..
नाशिकरोड | प्रतिनिधी
नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तक्रार केल्यास संपूर्ण गल्ली जाळून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी सायंकाळी संबंधित मुलगी घरातील कचरा टाकण्यासाठी कचराकुंडीजवळ गेली असता संशयित मनोज डोगळे उर्फ मनोहर व सोनू डोगळे हे तिच्याजवळ आले. त्यापैकी सोनू डोगळे याने मुलीचा हात पकडून तिला जवळ खेचत “गाडीवर बस” असे म्हटले, तर मनोज डोगळे उर्फ मनोहर याने तिच्या कमरेवर हात ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
मुलीने आरडाओरडा केल्यानंतर दोघेही एमएच-१५ एफसी-३६१६ क्रमांकाच्या दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित पुन्हा काही मित्रांसह परिसरात आले. “आमच्याविरुद्ध कोणी तक्रार केली तर संपूर्ण गल्ली जाळून टाकू,” अशी धमकी देत त्यांनी स्थानिक युवक रुद्रा माने व ऋषी माने यांना मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिस येण्यापूर्वीच संशयित फरार झाले होते.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंग, धमकी व मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
ब्ल्यू स्टार न्यूज



