ताज्या बातम्या नाशिक

आयएसपी नाशिकच्या अग्निशमन विभागातर्फे रिलायन्स स्मार्ट बाजारात अग्निसुरक्षा जनजागृती अभियान….अग्निशामक यंत्रांच्या वापराचे प्रात्यक्षिक…. नागरिक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

आयएसपी नाशिकच्या अग्निशमन विभागातर्फे रिलायन्स स्मार्ट बाजारात अग्निसुरक्षा जनजागृती अभियान….अग्निशामक यंत्रांच्या वापराचे प्रात्यक्षिक…. नागरिक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद….

नाशिक इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी), नाशिक येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या (सीआयएसएफ) अग्निशमन विभागातर्फे रिलायन्स स्मार्ट बाजार, नाशिक येथे मंगळवारी अग्निसुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले. कमांडंट, सीआयएसएफ युनिट, इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक यांच्या निर्देशानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या अभियानादरम्यान रिलायन्स स्मार्ट बाजारातील अधिकारी, कर्मचारी, ग्राहक तसेच उपस्थित नागरिकांना आग लागण्याची संभाव्य कारणे, आग प्रतिबंधक उपाययोजना, आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितपणे बाहेर पडण्याच्या पद्धती आणि विविध प्रकारच्या अग्निशामक यंत्रांचा योग्य वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी अग्निशमन पथकाने अग्निशामक यंत्रांच्या वापराचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. उपस्थितांना स्वतः अग्निशामक यंत्र हाताळण्याचा सराव करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे आग लागल्यास घाबरून न जाता त्वरित आणि सुरक्षितपणे प्रतिसाद कसा द्यावा, याबाबत नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.
या जनजागृती अभियानाला ग्राहक, नागरिक आणि रिलायन्स स्मार्ट बाजारातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अशा उपक्रमांमुळे समाजात अग्निसुरक्षेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होते. तसेच आपत्कालीन परिस्थितीत होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांना आवश्यक माहिती आणि प्रशिक्षण मिळते.
हा कार्यक्रम सहायक कमांडंट विजय सोनवणे, दुर्गाप्रसाद प्रधान, सागर नरवडे आणि पंकज कुमार यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *