नाशिक पोलिसांची मोठी कारवाई: ३ वर्षांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील घरफोडी बहाद्दर अखेर जेरबंद….

नाशिक मागील तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आणि रेकॉर्डवरील फरार असलेला घरफोडीचा अट्टल आरोपी अखेर नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्र. २ च्या जाळ्यात अडकला आहे. अफजल हुसेन सय्यद (वय २९, रा. बलकवडे व्यायामशाळेसमोर, बलकवडे चाळ, भगूर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात तो दीर्घकाळापासून फरार होता.
नाशिक शहराचे पोलीस आयुक्त मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहा. पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते.
या आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी व अंमलदार फरार आरोपींचा शोध घेत असताना, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे व पोलीस अंमलदार तेजस मते यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. उपनगर पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ३२७/२०२४ (भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(४), ३(५)) मधील फरार आरोपी अफजल सय्यद हा भगूर गावात आला असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली.
माहिती मिळताच युनिट २ चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक संजय सानप,मनोहर शिंदे, पोलीस हवामान नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते आणि चालक पोलीस अंमलदार जितेंद्र वजीरे यांच्या पथकाने भगूर येथील बलकवडे चाळ परिसरात अत्यंत शिताफीने सापळा रचला.
पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अफजल सय्यद याला पोलिसांनी चारोंबाजूंनी घेरून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरफोडीच्या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वी न्यायालयाने सी.आर.पी.सी. २९९ प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले होते. गुन्हे शाखेने त्याला अटक केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई आणि सखोल तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, एसीपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, पीएसआय संजय सानप आणि गुन्हे शाखा युनिट २ च्या संपूर्ण अंमलदारांनी केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.





