भद्रकाली पोलीस ठाण्याची धडाकेबाज कामगिरी… लॅपटॉप चोरणाऱ्या आरोपीला २४ तासांत ठोकल्या बेड्या….

नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी एक मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ऑफिसचे कुलूप तोडून ३० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरणाऱ्या अट्टल चोराला पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. रामचंद्र युवराज गुंभाडे (वय २० वर्षे, रा. दिंडोरी, सध्या रा. भद्रकाली, नाशिक) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.
नाशिकच्या एन.डी. पटेल रोडवरील एका बंद ऑफिसचे कुलूप तोडून अज्ञात चोराने ३०,००0 रुपये किमतीचा ‘लेनोव्हो’ कंपनीचा लॅपटॉप चोरून नेला होता. या प्रकरणी अनिल कोल्हे यांच्या फिर्यादीवरून ५ जून २०२६ रोजी भद्रकाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलिसांचे गुन्हे शोध पथक तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. गुप्त माहितीदार आणि मानवी कौशल्याचा अचूक वापर करत, पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपी रामचंद्र गुंभाडे याला पंचशील नगर भागातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल (३० हजारांचा लॅपटॉप) हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) तुषार आढाव यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस अंमलदार कय्युम सय्यद, सतीश साळुंके आणि सहकाऱ्यांनी ही धडक कारवाई केली. भद्रकाली पोलिसांच्या या वेगवान कामगिरीमुळे नाशिककरांमधून पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे.




