नाशिक सहकारी साखर कारखान्यात बिबट्याचे दर्शन….
मध्यरात्री व्यवस्थापकीय संचालकांच्या निवासस्थानाजवळ सुरक्षारक्षकांसमोर बिबट्या…..
-
नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा आढळून आल्याने परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या (एमडी) निवासस्थानाच्या कंपाउंडलगत मध्यरात्रीच्या सुमारास पहारा देणाऱ्या सुरक्षारक्षकांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले. विशेष म्हणजे, कारखान्याच्या एसटीपी विभागातील सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यांच्या परिसरात बिबट्याची तीन पिल्लेही सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आली. गत महिन्यात कारखान्याच्या परिसरातील सोयाबीनच्या शेतात सायंकाळच्या सुमारास शेतकऱ्यांना बिबट्या दिसला होता. त्यानंतर काल मध्यरात्री कारखान्याचे सुरक्षारक्षक चंदू सानप व अंकुश बोराडे हे परिसरात रात्रीची गस्त घालत असताना त्यांना एमडी निवासस्थानाच्या कंपाउंडजवळ बिबट्या दिसला. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत बिबट्याचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले.
अचानक समोर बिबट्या दिसल्याने आणि जवळ कोणतीही पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने या कर्मचाऱ्यांना बिबट्या निघून जाईपर्यंत काही काळ सुरक्षित ठिकाणी दबा धरून बसावे लागले.
-
कारखाना सध्या बंद असल्याने या परिसरात बिबट्याच्या मादीने तीन पिल्लांना जन्म दिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या परिसरात बिबट्याची मादी आणि तिच्या पिल्लांचा वावर असल्याची शक्यता आहे.
नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात माध्यमिक विद्यालय असून, चारी बाजूंनी नाणेगाव, वडगाव, चिंचोली, शिंदे व पळसे या गावांतील शेतजमिनी आहेत. सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असल्याने शेतकरी दिवसरात्र शेतात काम करीत आहेत. अशा परिस्थितीत बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी, ग्रामस्थ तसेच कारखाना परिसरातील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि आवश्यकतेनुसार पिंजरा लावून बिबट्याची मादी व तिच्या पिल्लांना सुरक्षितपणे बंदिस्त करावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी व सुरक्षा अधिकारी अनिल खापरे, चंद्रभान सानप, अंकुश बोराडे, शिवाजी गायधनी, अशोक वाघ, समाधान गायधनी, रंजन चौधरी, गणपत गायधनी, देवीदास गायधनी, विशाल शिंदे, ज्ञानेश्वर गायधनी, सुनील आगळे, संतोष गायधनी, सुनील गायधनी, संजय गायधनी व बाळासाहेब गायधनी यांनी केली आहे.





