क्राईम ताज्या बातम्या

अंबाड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २ लाखांचा चोरीचा ऐवज जप्त, इराणी टोळीच्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या…..

अंबाड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २ लाखांचा चोरीचा ऐवज जप्त, इराणी टोळीच्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या…..

नाशिक : अंबाड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत चेन स्नॅचिंग (सोन्याची साखळी चोरी) करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून २ लाख रुपये किमतीचे एकूण ३४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे परिसरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी सौ. भावेश भूषण पवार (वय ३५, रा. सिडको, नाशिक) या त्यांच्या मित्रासोबत घराबाहेर गप्पा मारत उभ्या होत्या. त्याचवेळी एका काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या २५ ते ३० वयोगटातील दोन अज्ञात इसमांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी अंबाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ९८/२०२५, बी.एन.एस. कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सोलापूरच्या मोहोळमधून आवळल्या आवळल्या मुसक्या
या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर करत होते. तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकाचे अंमलदार फरिद इनामदार यांना गोपनिय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार संशयित आरोपी हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस पथकाने तात्काळ मोहोळ येथे जाऊन शोध घेतला. मात्र, आरोपी नाशिकमध्येच असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून संशयिताला ताब्यात घेतले.

गुलामहुसेन जाफरहुसेन इराणी (वय ३७, व्यवसाय – विक्री, रा. मोहोळ रेल्वे स्टेशन जवळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) गुन्ह्याची दिली कबुली.

संशयित गुलामहुसेन इराणी याला अंबाड पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेले *३४.०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (धातुची लगड), ज्याची किंमत एकूण २,००,०००/- रुपये आहे, ती हस्तगत करण्यात आली आहे.

ही यशस्वी कामगिरी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,पोलीस उपआयुक्त (परिमंडळ २) किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारीयांच्या मार्गदर्शनाखाली; अंबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेंद्रसिंग राजपूत, पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे (गुन्हे)आणि पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरते  सूचनेनुसार पार पडली.

गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी विलास पडोळक, योगेश देसले, सुभाष तुबे, फरिद इनामदार, सचिन करंजे, मयुर पवार, उल्हास गांगुर्डे, अनिल गाढवे, तुषार मते, वैभव एखंडे, केशव ढगे, संजय सपकाळे, सागर जाधव आणि समाधान शिंदे यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विलास पडोळकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *