ताज्या बातम्या नाशिक

नाशिकरोडच्या सहायक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयाचे पुन्हा जुन्या ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी……

नाशिकरोडच्या सहायक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयाचे पुन्हा जुन्या ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी……

नाशिकरोड येथील सहायक पोलीस आयुक्त, विभाग-४ यांचे कार्यालय काही दिवसांपूर्वी नवीन उपनगर पोलीस ठाणे येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नागरिक, पक्षकार, वकील तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने हे कार्यालय पुन्हा पूर्वीच्या मध्यवर्ती ठिकाणी हलविण्याची मागणी होत आहे.
पूर्वी हे कार्यालय नाशिकरोड येथील मोक्याच्या व मध्यवर्ती ठिकाणी कार्यरत होते. या कार्यालयामध्ये परवाने व परवानग्या, तक्रार अर्ज, अर्जांची चौकशी, माहिती अधिकार (RTI) संबंधित कामकाज, ॲट्रॉसिटी गुन्ह्यांतील जबाब नोंदविणे तसेच इतर अनेक महत्त्वाची प्रशासकीय कामे केली जातात. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने नागरिक या कार्यालयात येत असतात.
पूर्वीच्या कार्यालयाच्या परिसरात रेव्हेन्यू कमिशनर कार्यालय, कुटुंब न्यायालय, सत्र न्यायालय, न्यायिक न्यायालय अगदी जवळ असल्याने नागरिक, पक्षकार आणि वकिलांना एकाच परिसरात विविध शासकीय कामे पूर्ण करणे सोयीचे होत होते. नाशिक पुणे महार्गावर नाशिकरोडला महसूल कार्यालय, न्यायालय आदी महत्वाचे विभाग आहेत. याठिकाणी येणे जाणे अगदी सोयीस्कर असून त्यामुळे वेळ आणि खर्चाचीही बचत होत होती.
मात्र, नवीन उपनगर पोलीस ठाण्यात स्थलांतरित झालेले कार्यालय शहराच्या आतल्या भागात असून तिसऱ्या मजल्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना तेथे पोहोचणे कठीण जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या सोयीचा विचार करून सहायक पोलीस आयुक्त, विभाग-४ यांचे कार्यालय पुन्हा पूर्वीच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी नागरिक, वकील आणि विविध सामाजिक स्तरातून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *