सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या……पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा…..
नाशिकरोड जेलरोड परिसरातील दसक गाव येथे सासरच्या सातत्याने होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका ४० वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आशा प्रवीण घोटेकर असे मृत विवाहितेचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील गणेश गोपाळराव वाळके यांची बहीण आशा हिचा विवाह २००८ मध्ये दसकगाव येथील प्रवीण साहेबराव घोटेकर याच्याशी झाला होता. संसार सुरळीत सुरू असताना लग्नाच्या काही वर्षांनंतर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला. २०१८ मध्ये चारचाकी वाहन व फ्लॅट घेण्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. बहिणीचा संसार टिकावा या हेतूने गणेश वाळके यांनी आपल्या आईच्या नावावरील जमीन विकून ही रक्कम दिली होती.
मात्र त्यानंतरही छळ कमी न होता उलट वाढत गेला. आईच्या निधनानंतर वारसा हक्कावरून आशा हिला मारहाण करण्यात आली तसेच तिचे सुमारे २१ तोळे सोन्याचे दागिने सासरच्यांनी काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पती प्रवीण घोटेकर याचे इतर महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप असून, याबाबत जाब विचारल्यावर तिलाच धमकावण्यात येत होते. सासू, सासरे व दिराने तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली, तर “जादूटोण्याच्या साहाय्याने तुला मारून टाकू” अशीही भीती दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बुधवारी ६ मे रोजी सकाळी सुमारे ७ वाजता आशा दरवाजा उघडत नसल्याने तिच्या भावाला फोन करण्यात आला. कुटुंबीय नाशिकला पोहोचण्यापूर्वीच बिटको रुग्णालयात तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. घरातील सततच्या छळामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची फिर्याद नाशिकरोड पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात पती प्रवीण साहेबराव घोटेकर, साहेबराव सावळीराम घोटेकर, लताबाई साहेबराव घोटेकर, राजेंद्र साहेबराव घोटेकर, चित्रा राजेंद्र घोटेकर आणि आरती नयन गोसावी यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करत आहेत.





