अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई: चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघड, २ लाखांचा मुद्देमाल जप्त…

नाशिक (प्रतिनिधी) – अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत चेन स्नॅचिंगच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा केला असून, आरोपींकडून सुमारे २,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दनसिंग राजपूत यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी उत्तमनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सुमारे १३ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आले होते. त्याचप्रमाणे १९ मार्च २०२६ रोजी स्वामी विवेकानंदनगर येथे आणखी एका महिलेकडून अंदाजे ११ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. या दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
तपासादरम्यान पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली. आरोपींची नावे आशीष योगेश भांबोरे (वय २५) व भूषण अनिल शिरसाट (वय २८) अशी असून, त्यांच्याकडून दोन्ही गुन्ह्यांतील एकूण १४ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपींनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
या कारवाईत पोलिसांनी सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अंबड पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.





