क्राईम ताज्या बातम्या

५ गोवंशीय जनावरांची सुटका; अवैध कत्तलीच्या तयारीत असलेला आरोपी ताब्यात….

५ गोवंशीय जनावरांची सुटका; अवैध कत्तलीच्या तयारीत असलेला आरोपी ताब्यात….

भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाची धडक कारवाई; महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल….

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल व मांस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत ५ गोवंशीय जनावरांची सुटका केली असून जाकीर बशीर शाह (वय २९, रा. फुलेनगर, मांगीरबाबा चौक, वडाळागाव, नाशिक) याला ताब्यात घेतले आहे.
नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल व मांस विक्रीला आळा घालण्यासाठी दिवसरात्र प्रभावी गस्त घालून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-१) मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त (सरकारवाडा विभाग) प्रमोद वाघ आणि भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहीते यांच्या नेतृत्वाखाली प्रभाकर आहेर, कय्युम सैय्यद, निलेश विखे आणि पोलीस शिपाई अविनाश थेटे हे परिसरात गस्त घालत असताना दि. २६ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ३.५० वाजता पोलीस हवालदार कय्युम सैय्यद यांना गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीनुसार पथकाने बागवानपुरा, कोंबडावाडा परिसरातील शाह आलम मटन दुकानावर छापा टाकला. यावेळी तेथे अवैध कत्तलीसाठी बांधून ठेवलेली ५ जिवंत गोवंशीय जनावरे आढळून आली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या जाकीर बशीर शाह याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, १९९५ मधील कलम ५(अ), ५(ब), ९ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० च्या कलम ११ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रभाकर आहेर करीत आहेत.
भद्रकाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत असून शहरात गोवंशीय जनावरांच्या अवैध कत्तल व मांस विक्रीविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *