वादळी वाऱ्यामुळे पडलेली झाडे हटवून नाशिक रोड अग्निशमन दलाची तातडीची मदत….वाहतूक सुरळीत….
नाशिक रोड अग्निशमन दलाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तातडीने घटनास्थळी धाव घेत पडलेली मोठी झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली तसेच संभाव्य धोका टाळला.

पहिल्या घटनेत वडनेर रोडवरील आर्टिलरी गेटसमोर मोठे भेंडीचे झाड रस्त्यावर कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला दूरध्वनीद्वारे मिळाली. झाडाखाली केळी विक्रेत्याची हातगाडी व भाजी विक्रेत्यांच्या गाड्या दबल्या गेल्या होत्या. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी झाडाखाली अडकलेल्या गाड्या सुरक्षितपणे बाहेर काढल्या व झाड कटरच्या साहाय्याने कापून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा केला.

दुसऱ्या घटनेत जेलरोड येथील कॅनल रोड परिसरात एक मोठे जंगली झाड एमएसईबीच्या मुख्य वीजवाहिनीवर तसेच स्ट्रीट लाईटच्या पोलावर कोसळल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे परिसरात मोठा धोका निर्माण झाला होता. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोहोचून झाड कटरच्या साहाय्याने झाडाचे तुकडे केले. वीजवाहिनी, स्ट्रीट लाईटचा पोल आणि रस्त्यावर पडलेले झाड हटवून परिसर सुरक्षित केला तसेच वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

या बचावकार्यात नाशिक रोड अग्निशमन केंद्राचे लीडिंग फायरमन टी. एन. भास्कर, पी. जी. कर्डक, विशाल निकम तसेच वाहनचालक शुभम बोराडे आणि प्रफुल गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावत तत्पर सेवा बजावली. त्यांच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले.






