सातपूर बॅटरी चोरीचे गूढ उकलले; गुन्हे शाखा युनिट-२ कडून सराईत गुन्हेगार जेरबंद….

नाशिक : सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयशर गाड्यांच्या बॅटरी चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी सातपूर परिसरातून आयशर गाड्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी..
गुन्हे शाखा युनिट-२ चे अधिकारी आणि अंमलदार या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना, त्यांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली. त्यात एक संशयित रिक्षातून बॅटरी घेऊन जाताना दिसून आला. पोलिसांनी सलग ५ दिवस तपास करत सुमारे ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि संशयित रिक्षाचा शोध लावला.
सापळा रचून अटक
तपास सुरू असताना पोलीस हवालदार अतुल पाटील व मनोज परदेशी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संबंधित रिक्षा (क्र. MH 15 FU 9812) वडाळागाव येथील मनपा प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ उभी आहे. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून अनिकेत गणेश पाटील (वय २०, रा. माळी गल्ली, वडाळागाव) याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई..
ही यशस्वी कामगिरी गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, मुख्तार खान पठाण, बाळू शेळके, गुलाब सोनार, अतुल पाटील, मनोज परदेशी, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण आणि सुनील खैरनार यांच्या पथकाने केली आहे.





