चंद्रपूर

चंद्रपूर हादरले! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रॅलीतील थरार, डीजेत नाचताना वाद; मध्यस्थीसाठी गेलेल्या इसमाला चाकूने भोसकले

चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना गांधी चौकात घडलेल्या धक्कादायक घटनेने शहर हादरले. डीजेवर नाचताना झालेल्या धक्काबुक्कीतून वाद चिघळल्याने मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या इसमाची पाच युवकांनी मिळून चाकूने भोसकून हत्या केली. या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
रविकांत उर्फ रिक्की टेभूरकर (४०) असे मृताचे नाव असून अनिकेत ताराचंद गलबले (२१) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांच्या पथकाने रेहान अशफाक पठाण, बादल भैसारे, चेतन सोनवणे, सुहान पठाण व शेख जीशान, सर्व रा. चंद्रपूर, यांना घटनेच्या दोन तासांच्या आत बेड्या ठोकल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवारी शहरातील विविध विहारांतून सायंकाळपासून भव्य रॅली काढण्यात आली होती. हजारो अनुयायी या रॅलीत सहभागी झाले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास इंदिरा नगर येथील भीमरत्न बहुद्देशीय युवा संस्थेची रॅली गांधी चौकात पोहोचली. यावेळी डीजेच्या तालावर नाचताना युवकांमध्ये धक्काबुक्की झाली.
या क्षुल्लक कारणावरून काही युवकांमध्ये वाद निर्माण झाला व त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. हा वाद मिटवण्यासाठी रविकांत व अनिकेत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त युवकांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. गंभीर जखमी अवस्थेत रविकांत यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी रेहान पठाण याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासांत उर्वरित चार आरोपींनाही अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *