क्राईम ताज्या बातम्या

चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंदेला अटक….उपनगर पोलिसांची कारवाई…..

 चंद्रशेखर उर्फ पिंटू शिंदेला अटक….उपनगर पोलिसांची कारवाई…..

खंडणी वसूल करणाऱ्या खाजगी सावकाराला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खाजगी सावकाराने बंदुकीचा धाक दाखवून एका हॉटेल व्यावसायिकाकडून आठ लाख रुपयांची खंडणी घेतल्याची घटना उघडकीस आल्याने सावकारांचे जाळे खोलवर पसरले असल्याचे सिद्ध होते. नांदुरी, ता. कळवण येथील किरण भास्कर कानडे यांचे हॉटेल गौतमी या नावाने हॉटेल व्यवसाय असून कानडे यांना हॉटेल व्यवसायासाठी पैशांची गरज भासल्याने त्यांनी सन 2014 ते एप्रिल 2025 या काळात नाशिकरोड येथील खासगी सावकार चंद्रशेखर प्रभाकर शिंदे ऊर्फ पिंटू शिंदे यांच्या कार्यालयात अजय दुबे याच्या मध्यस्थीने तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते.

तीन लाख रुपयांच्या बदल्यात शिंदे याने फिर्यादी कानडे व त्यांच्या भावाच्या नावावर असलेला प्लॉट रजिस्टर साठेखताने स्वतःच्या नावावर जबरदस्तीने लिहून घेतल्याचे कानडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कानडे व्याजाची रक्कम देऊ न शकल्याने शिंदे याने कानडे यांचे हॉटेल गौतमी व त्यांचे वडिलोपार्जित घर रजिस्टर खरेदी खताने स्वतःच्या नावावर लिहून घेतले.

या खरेदी खताच्या आधारे त्याने कळवण येथील अंबिका पतसंस्थेतून स्वतःच्या नावावर कर्ज घेऊन त्या कर्जाची परतफेड कानडे यांना जबरदस्तीने करण्यास भाग पाडले. शिंदे यांनी कानडे यांना ऑफिसमध्ये बोलावून पिस्तुलाचा धाक दाखवीत जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर कानडे यांच्या मालकीचे हॉटेल व घर कानडे यांच्या नावावर करण्यासाठी शिंदे याने आणखी 15 लाख रुपयांची मागणी केली. या रकमेपैकी त्याने जबरदस्तीने धाक दाखवून आठ लाख रुपये खंडणीच्या स्वरूपात वसूल केले. या सर्व प्रकारादरम्यान मध्यस्थी असलेल्या अजय दुबे याने देखील फिर्यादी कानडे यांना मारहाण करून धमकी दिली. कानडे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात पिंटू शिंदे व अजय दुबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *