नाशिक कल्याण लोकलची ट्रायल करा…. दानवेंचे मुंबई रेल्वे विभागाला आदेश……
गेल्या सात वर्षापासून बहुप्रतिक्षित असणारा नाशिक कल्याण लोकल प्रकल्प सध्या ऍक्टिव्ह होण्याच्या मार्गावर आहे. रेल्वेच्या जनशिकायत कार्यालयाने मुंबई विभागाला पत्र पाठवून पुढील कार्यवाही करायला सांगितले आहे.
नाशिक-कल्याण लोकलची घाटातील चाचणी घेण्यासाठी आरडीएसओ स्टाफ उपलब्ध करण्याची सूचना राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यामार्फत रेल्वेचे अधिकारी डॉ. जगदीश सकवान यांनी जनशिकायत कार्यालयामार्फत मुंबई विभाग रेल्वेचे जनरल मॅनेजर(सचिव) यांना पत्राद्वारे कळवले आहे.
नाशिक कल्याण रेल्वे प्रकल्प अनेक दिवसापासून लाल फितीत अडकला आहे लोकप्रतिनिधींची उदासीनता आणि रेल्वे खात्याची निष्क्रियता यामुळे या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला जात नाही. घाटातून रेल्वे लोकल धावण्या संदर्भात लखनऊच्या आरडीएसओ कार्यालयाच्या चाचणीची आजपर्यंत वाट पाहिली जात होती आरडीएसओ चे कर्मचारी आजपर्यंत उपलब्ध होत नव्हते. या संदर्भात नाशिकचे भूमिपुत्र आणि या प्रकल्पाचे जन्मदाते निवृत्त लोको निरीक्षक वामन महादेव सांगळे यांनी या संदर्भात पन्नासहून अधिक वेळा तक्रारी केल्या होत्या या तक्रारींची दखल घेत जनशिकायत कार्यालयामार्फत मध्य रेल्वेच्या सचिवांना पत्र प्राप्त झाले आहे. या संदर्भात पुढील कार्यवाही लवकरात लवकर करून त्याची माहिती पुन्हा जनशिकायत कार्यालयाने मागवली आहे त्यामुळे मध्य रेल्वे चे अधिकारी सध्या ऍक्टिव्ह होऊन आर डी एस ओ इन्स्पेक्शन साठी सरसावलेले आहेत. निवडणुकीपूर्वी हा प्रकल्प कार्यान्वित व्हावा अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. ही लोकल सुरू झाल्यावर विद्यार्थी शेतकरी नोकरदार महिला लहान-मोठे व्यावसायिक यांना कनेक्टिव्हिटी ला सोपे जाणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आपला पिकवलेला भाजीपाला मुंबईपर्यंत नेऊन त्याला हायटेक बाजारपेठ मिळणार आहे. नाशिकच्या सर्वांगीण कनेक्टिव्हिटी ला नाशिक कल्याण लोकल प्रकल्प हा दिशादर्शक ठरेल असे मत विकासकांनी व्यक्त केले आहे.
पस्तीस कोटी पाण्यात –
नाशिकचा विकास साधणारी नाशिक-कल्याण लोकल 35 कोटी रुपये खर्च करुन पंधरा महिन्यांपूर्वी चेन्नईच्या कारखान्यात तयार झाली. नंतर ती मुंबईत कुर्ला कार शेड येथे येऊन आधुनिकीकरण होऊन तयार झाली. मात्र, अजूनही ती धूळखात पडलेली आहे. चाचणीसाठी नऊ लाखांचा निधी मंजूर होऊन चाचणीची तयारी सर्व तयारी झाली असतानाच ही लोकल स्थगित करण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त झाली होती . ही गाडी सुरु करावी यासाठी सह्यांची मोहीम नाशिककरांनी राबवली. वामन सांगळे यांनी या लोकलला नागरिकांचे समर्थन मिळविण्यासाठी सह्यांची मोहिम घेतली. या सह्यांसह मागणीचे निवेदन पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना वामन सांगळे यांनी पाठवले होते.
.