पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली..
महाविकास आघाडीच्या मागणीला मिळाले यश
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने अखेर हटवले आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना हटवले आहे. ‘एएनआय’ने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले होते. मात्र शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांना क्लीन चिट देऊन त्यांची राज्याच्या महासंचालकपदी नियुक्ती केली होती. त्यांचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये पूर्ण झाला होता. मात्र त्यानंतर सरकारने त्यांना जानेवारी २०२६ पर्यंत बढती दिली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. रश्मी शुक्ला यांची पार्श्वभूमी वादग्रस्त राहिलेली असून, नियमबाह्य कामे, तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकावण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोप नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केला होता.