वाघाची कातडी विकणारी टोळी जेरबंद….. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…… बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनविण्यासाठी शिकार…..
वन्यप्राणी बिबटया वाघास ठार मारून, वाघाची कातडी विकणारी टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगर, द-या, धरणे, नदी नाल्यांनी व्यापलेला असून याठिकाणी वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठया प्रमाणात आहे.अशा परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयीत इसम हे अल्पावधीत पैसे कमविण्यासाठी अवैध व्यवसाय करीत असतात.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्हयातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सत्वर कारवाई कठोर पावले उचलली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार घोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर गावचे शिवारातील मोराचे डोंगराचे पायथ्याशी काही संशयीत इसम वन्यप्राणी बिबटया वाघाची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदारांनी १३ मार्च रोजी मोराचे डोंगराचे पायथ्याशी सापळा रचुन संशयीत नामदेव दामु पिंगळे, वय ३०, रा. पिंपळगाव मोर, ता. इगतपुरी, संतोष सोमा जाखीरे, वय ४०, रा. मोगरा, ता. इगतपुरी, रविंद्र मंगळु आघाण, वय २७, रा. खैरगाव, ता. इगतपुरी, बहिरू उर्फ भाउसाहेब चिमा बेडकोळी, वय ५०, रा. पिंपळगाव मोर, वाघ्याची वाडी, ता. इगतपुरी, बाळु भगवान धोंडगे, वय ३०, रा. धोंडगेवाडी, ता. इगतपुरी यांना ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातील गोणपटातून वन्यप्राणी बिबटया वाघाची कातडी व एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.
सदरची कातडी ही परिक्षणाकरीता जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय, नाशिक येथे पाठविली असता ती वन्यप्राणी बिबटया वाघाची असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी, इगतपुरी यांचे पथक करीत आहे. सखोल तपास केला असता यातील आरोपी संतोष जाखीरे याचा साथीदार नामे सन्यासी दिलीप बाबा यास बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनविण्यासाठी वाघाची कातडी पाहिजे होती असे सांगितले. त्यासाठी यातील आरोपी नामदेव दामु पिंगळे हा गुरे चारण्यासाठी मोराचे डोंगरावर जात असे, सदर ठिकाणी वन्यप्राण्यांचे पाणी पिण्याचे डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटर सायकलच्या क्लजवायरचा गळफास तयार करून, पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबटया वाघास पकडून त्यास ठार मारले व त्यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबटया वाघाची कातडी काढून निर्जनठिकाणी सुकवत ठेवून सदरची कातडी ही सन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर आले आहे. सदर प्रकरणातील संशयीत आरोपी सन्यासी दिलीप बाबा याचा पोलीस पथक शोध घेत आहे.
सदरची कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलिस उप निरीक्षक नाना शिरोळे, संदिप नागपुरे, चेतन संवस्तरकर, मेघराज जाधव, हेमंत गरूड, पोना विनोद टिळे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, मनोज सानप यांच्या पथकाने केली आहे.