सिनेमा पाहून मध्यरात्री घरी परतणाऱ्या तरुणाच्या बुलेटला पिकअपची धडक… एकाचा मृत्यू, सैन्यदलातील जवान गंभीर….नाशिकरोड परिसरातील धक्कादायक घटना; पिकअप चालक फरार….जखमी जवानाला तातडीने पुण्याच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलवले….

मित्रांसोबत रात्रीचा शो पाहून दुचाकीने घरी परतणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाच्या बुलेटला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. पुणे रोडवर मध्यरात्री घडलेल्या या भीषण अपघातात २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर बुलेटवर मागे बसलेला सैन्यदलातील जवान गंभीर जखमी झाला आहे. पियुष विलास मोरे (वय २१, रा. सत्यम पार्क, जाचक नगर, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष हा आपल्या मित्रांसह सिटी सेंटर मॉल येथे सिनेमा पाहण्यासाठी गेला होता. सुट्टीवर नाशिकरोड येथे आलेला सैन्यदलातील जवान अनुराग दुबे हादेखील त्यांच्यासोबत होता. मध्यरात्री दोनच्या सुमारास चित्रपट संपवून पियुष आणि अनुराग बुलेटने घराकडे निघाले होते. इतर दोन मित्र दुसऱ्या दुचाकीवरून त्यांच्या मागे येत होते.
पुणे रोडवरील फेम सिनेमाजवळील पॉल ढाब्यासमोर बुलेट आली असता, नाशिकरोडकडून आलेल्या भरधाव पिकअपने अचानक तपोवन रोडच्या दिशेने वळण घेतले. पिकअपच्या अचानक कट मारण्यामुळे बुलेटची त्याला भीषण धडक बसली. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरात खळबळ उडाली. अपघातानंतर पिकअप चालक वाहनासह तिथून पसार झाला.
पियुषला त्याचे चुलते राज पवार यांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी तपासून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. अनुराग दुबे याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुण्याच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
पियुष महाविद्यालयीन द्वितीय वर्षात शिकत होता. त्याचे वडील जळगाव येथे आयटीआयमध्ये सेवेत आहेत. पियुषच्या पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. देवळाली गाव येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला असून हवालदार संदीप हिवाळे पुढील तपास करत आहेत.




