नाशिकरोड प्रेस वसाहतीत साकारले ‘प्रति पंढरपूर’..आयएसपी-सीएनपी गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात…..

औद्योगिक नगरी नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी) आणि करन्सी नोट प्रेस (सीएनपी) वेल्फेअर फंड कमिटीतर्फे ७२ वर्षांची प्रदीर्घ परंपरा जपत यंदाही गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावात सुरू झाला आहे.

यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाचे पंढरपूर मंदिर असून, भव्य देखाव्याच्या माध्यमातून संपूर्ण परिसर विठूनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे.
मंडळाचे अध्यक्ष मंगेश कासवेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंगलप्रसंगी कामगार संघटना व वेल्फेअर फंड कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिष्ठापना सोहळ्याला जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेंद्र टाकेकर, रामभाऊ जगताप, आप्पाजी जगताप, मच्छिंद्र जाधव, संतोष शिरसाठ, अशोक अहिरे, यू. जी. पाटील, सुरेश आव्हाड, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, खजिनदार अशोक पेखळे, अण्णा सोनवणे, सुधीर पगारे यांच्यासह प्रेस कर्मचारी व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची धुरा जनरल सेक्रेटरी अण्णाजी सोनवणे आणि करमणूक सेक्रेटरी सुधीर पगारे यांनी सांभाळली.

मुंबईच्या नामांकित ‘सुकृती आर्ट्स’चे संचालक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विलोभनीय देखावा साकारण्यात आला आहे. सुमारे ३५ कारागिरांनी सलग २७ दिवस अहोरात्र मेहनत घेऊन पंढरपूर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभी केली आहे. मंदिर परिसरामध्ये महाराष्ट्रातील १६ प्रमुख संतांच्या जिवंत वाटणाऱ्या प्रतिकृती उभारण्यात आल्या असून, भाविकांसाठी हा देखावा आध्यात्मिक व कलात्मक पर्वणी ठरत आहे. हा भव्य देखावा पाहण्यासाठी नाशिकरोड परिसरासह शहरातून भाविकांची मोठी गर्दी होत आहे.





