क्राईम ताज्या बातम्या

जेलरोड भागात घरांवर दगडफेक……टवाळखोरांचा बंदोबस्त करा….. त्रस्त रहिवाशांची पोलिसांकडे मागणी.,…

जेलरोड भागात घरांवर दगडफेक……टवाळखोरांचा बंदोबस्त करा….. त्रस्त रहिवाशांची पोलिसांकडे मागणी.,…

नाशिकरोड जेलरोड परिसरातील कॅनल रोडवरील राजीव गांधी नगर आणि इंगळे नगर भागात गेल्या महिनाभरापासून अज्ञात समाजकंटकांकडून घरांवर दगडफेक करण्याचे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दगडफेकीमुळे महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, संबंधित टोळक्याचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरापासून काही ठराविक घरांना लक्ष्य करून रात्री तसेच दिवसा अचानक दगडफेक केली जात आहे. घरांच्या पत्र्यांवर आणि छतांवर मोठे व टोकदार दगड फेकले जात असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, समाजकंटकांचा उद्देश नागरिकांमध्ये भीती पसरविण्याचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कॅनल रोड हा परिसरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून, येथून दिवसभर पादचारी, वाहनधारक, नोकरदार तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. अशा ठिकाणी सुरू असलेल्या दगडफेकीमुळे एखाद्या निष्पाप नागरिकाला किंवा विद्यार्थ्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिक मानसिक तणावाखाली असून, पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी, संशयितांची शोधमोहीम राबवावी तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून समाजकंटकांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकारावर पोलीस प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, याकडे राजीव गांधी नगर व इंगळे नगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *