ताज्या बातम्या महाराष्ट्र

महावितरण अधिकाऱ्यांच्या गैर हजेरी विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक…..

महावितरण अधिकाऱ्यांच्या गैर हजेरी विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक…..

मनमाड : महावितरण कंपनीच्या मनमाड उपविभागातील अधिकारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहत नसल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदगाव तालुका सचिव शैलेश प्रकाश सोनवणे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

मनमाड उपविभागाची आर-१ व आर-२ तसेच यू-१ व यू-२ अशी विभागणी करण्यात आली असून, संबंधित विभागांसाठी विद्युत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र हे अधिकारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध नसतात, तसेच काही अधिकारी मुख्यालयी न राहता बाहेरगावी राहत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांची कामाची वेळ नागरिकांना स्पष्टपणे कळवावी, तसेच कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारींसाठी जबाबदार अधिकारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होणे अथवा दुर्घटना घडल्यास जबाबदार अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, स्मार्ट मीटरच्या विरोधातील आंदोलनावेळी जुन्या वीजमीटर ग्राहकांच्या परवानगीशिवाय बदलले जाणार नाहीत, अशी कंपनीकडून हमी देण्यात आली होती. मात्र शहरातील विविध भागांत ग्राहकांच्या अनुपस्थितीत स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शैलेश सोनवणे यांनी दिला आहे.

तसेच महावितरण कंपनीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचे टाइमटेबल सार्वजनिक करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *