गुटख्याची चाेरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या एकाला तब्बल ८ लाख ५९ हजार ५६० रुपयांच्या मुद्देमालासह पकडण्यात आले. ही कारवाई विशेष पाेलिस पथकाने कासार शिरसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत केली. याबाबत कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी सांगितले की, शनिवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ९:४५ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गुटख्याची चाेरट्या मार्गाने वाहतूक हाेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची पडताळणी केल्यानंतर पथकाने कासार शिरसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत तांबाळा पाटी येथे सापळा लावला. संशयास्पद वाटणारी पांढऱ्या रंगाची कार (एमएच २४ सीडी ३५९३) पाेलिसांनी अडवली. कारची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा, पानमसाला आढळला.
यावेळी पोलिसांनी वाहनचालक मालक संजय काशिनाथ कन्ना (वय ४५, रा. उस्तुरी, ता. निलंगा) याला ताब्यात घेतले. या कारवाईत २ लाख ५९ हजार ५६० रुपयांचा अन्नसाठा जप्त केला. गुन्ह्यात वापरलेली ६ लाखांची कार जप्त करण्यात आली. याबाबत कासार शिरसी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक अमाेल तांबे यांच्या पथकातील प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी अक्षय जाधव, पोउपनि. आयुब शेख, पोउपनि. उत्तम जाधव, रामहरी भोसले, यशवंत घुगे, कासार शिरसी ठाण्याचे सपोनि. गर्जे, अंमलदार तपसे, नागमोडे यांच्या पथकाने केली.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
