शहरातील नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पांझरापोळ संस्थेच्या जागेलगत असलेल्या नैसर्गिक नाल्यावर थाटलेली अतिक्रमणे काढण्याऐवजी, अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याचा नावाने त्या जागी आणखी नवीन गाळे बांधण्याचा घाट महानगरपालिकेतर्फे घालण्यात आल्याचा गंभीर आरोप पांझरापोळ संस्थेने केला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ वर्षांपूर्वी यासंदर्भात दिलेले आदेश धाब्यावर बसवून महापालिका प्रशासन मनमानी करत असल्याची तक्रार देखील संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
पांझरापोळ संस्थेची पूर्वेकडील भिंत व मुनिसिपल हायस्कूल यादरम्यान पूर्वीपासून शासकीय जागेवर नाला अस्तित्वात आहे. या नाल्याच्या मुनिसिपल हायस्कूल लगतच्या भागात भराव टाकून नाला अरुंद करण्यात आला. या भरावाच्या ठिकाणी जवळपास ३७ जणांनी अतिक्रमणे थाटून व्यवसाय सुरू केले आहेत. या कृतीमुळे नैसर्गिक नाल्याचा प्रवाह खंडित झाल्याने भविष्यात अनेक समस्या उद्भवतील म्हणून पांझरा पोळ संस्थेने २०१७ मध्ये त्या विरोधात प्रांताधिकाऱ्यांकडे हरकत घेणारे अपील दाखल केले होते. या हरकतीनुसार तत्कालीन प्रांताधिकारी अजय मोरे यांनी नैसर्गिक नाला बुजविण्याचे काम तात्काळ बंद करून नाला पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते. महापालिका आयुक्तांनी सदर आदेशाचे पालन करण्याचे आणि या आदेशाचे पालन न केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ प्रमाणे आयुक्त हे शिक्षेस पात्र ठरतील, असेही या आदेशात बजावण्यात आले होते.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
