बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन करून देण्यासाठी काही खास दलाल अर्थात एजंट कार्यरत होते. रांगेत थांबलेल्या भाविकांशी ते संपर्क साधून जलद दर्शन करून देण्यासाठी दर निश्चित करायचे. नंतर संशयित विश्वस्त पुरूषोत्तम कडलगचे पुतणे अभिषेक व ओम कडलग यांच्याशी संपर्क साधून संबंधित भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था त्यांच्याच मदतीने करून दिली जात असत.
अवघ्या काही मिनिटांत दर्शन करून देण्यासाठी प्रति व्यक्ती दोन ते सहा हजार रुपये घेवून भाविकांची फसवणूक केली जात होती. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली चाललेल्या काळ्या बाजाराची ही कार्यपद्धती न्यायालयात मांडण्यात आली.अवघ्या १० मिनिटांत दर्शन करून देण्याच्या नावाखाली अलीकडेच दोन भाविकांची लुबाडणूक झाल्याचे समोर आले होते.
या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गोटीराम पेहरे (४१, खडकवाडी, त्र्यंबकेश्वर) आणि अभिषेक कडलग (त्र्यंबकेश्वर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. संशयित अभिषेक हा त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरूषोत्तम कडलग यांचा पुतण्या आहे. संशयित अभिषेक आणि त्याचा भाऊ ओम कडलग यांच्यासोबत कितीही लोक असले तरी त्यांना मंदिरात दर्शनासाठी थेट प्रवेश दिला जात होता. व्हीआयपी दर्शनाच्या काळ्या बाजारात विश्वस्त कडलगचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. विश्वस्त कडलगला न्यायालयात हजर करण्यात आले.

आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
