पुणे

वर्षात साडेपाच हजार पुणेकरांनी काढला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना; परदेशात ड्रायव्हिंगची वाढली क्रेझ

: परदेशात स्वतः वाहन चालवत पर्यटन करण्याकडे पुणेकरांचा कल वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ५ हजार ५५८ नागरिकांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (आयडीपी) काढला असून, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे अडीचशेने वाढली आहे.

पुण्यातून परदेशात नोकरी, शिक्षण आणि पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे परदेशात वाहन चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची मागणीही सातत्याने वाढत आहे. भारतामधील नागरिकांना परदेशात वाहन चालवायचे असल्यास आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (आयडीपी) घेणे आवश्यक असते. हा परवाना संबंधित नागरिकांच्या स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) दिला जातो. २०१८ पूर्वी ही प्रक्रिया पूर्णपणे मॅन्युअल होती. त्यामुळे परवाना मिळण्यास विलंब होत असे. मात्र, नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी २०१८ पासून ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. आता अर्जदारांना परिवहन मंत्रालयाच्या ‘सारथी’ पोर्टलवरून अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. या परवान्यासाठी अर्जदाराकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास पुन्हा चाचणी देण्याची गरज नसते. मात्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट आणि व्हिसा यांची पडताळणी केली जाते. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह आरटीओ कार्यालयात जाऊन पडताळणी करावी लागते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एका दिवसात परवाना दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *