अहिल्यानगर (अहमदनगर)

भोंदू खरातच्या ट्रस्टवरील विश्वस्त जितेंद्र शेळकेंचा अपघाती मृत्यू

कोपरगाव (जि. अहिल्यानगर) – येथील प्रसिद्ध उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके आणि त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचा समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. शेळके हे भोंदू अशोक खरात यांच्या शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष व विश्वस्त म्हणून कार्यरत होतेे.

छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे कारने येताना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी दुपारी हा अपघात झाला. या घटनेत त्यांचा १२ वर्षांचा मुलगा सुचेत जखमी झाला. मृत शेळके हे शिर्डीत खरातने केलेल्या जमीन खरेदीतील साक्षीदार असल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली होती. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा होती.
डॉ. शेळके यांचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कार अर्ध्याहून अधिक कंटेनरच्या खाली घुसली आणि तिचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

मदतकार्यात विलंब आणि हळहळ
अपघातानंतर धोत्रे ग्रामस्थ आणि सरपंच प्रदीप चव्हाण यांनी तातडीने धाव घेत मुलाला बाहेर काढले. मात्र, कार कंटेनरखाली अडकल्याने अनुराधा शेळके यांना बाहेर काढणे कठीण झाले. अपघातानंतर काही वेळ अनुराधा शेळके यांचा आवाज येत होता, मात्र क्रेन पावणे दोन तासांनी पोहोचल्यामुळे त्यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत.

शिर्डीच्या विकासाचा आधारस्तंभ कोसळला
डॉ. शेळके हे ‘चला शिर्डीला जगातील एक सुंदर शहर बनवू या’ हे घोषवाक्य घेऊन ते काम करत होते. ‘ग्रीन अँड क्लीन फाउंडेशन’च्या माध्यमातून शिर्डी शहरात १५ हजार वृक्षांचे रोपण आणि संवर्धन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
अमेरिकेत १० वर्षे पशुवैद्यकीय व्यवसाय करताना, त्यांनी साईबाबांच्या विचारांचा जगभरात प्रचार केला आणि अनेक साई मंदिरे उभारण्यात भूमिका बजावली. त्यांचे वडील आणि बंधूनी साई संस्थानचे विश्वस्त पद भूषवले होते.

अपघात की घातपात?
उद्धव सेनेच्या प्रवक्त्या तथा उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्या एक्सवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भोंदू खरातच्या जीवाला धोका होऊ शकतो, अशी भीती राज्यातील काही नेत्यांनी व्यक्त केली होती.
ती भीती कुठेतरी शेळके यांच्या अपघाताने अधोरेखित झाली आहे. खरात प्रकरणातील सत्यच बाहेर येऊ नये, असे काही लोकांना वाटते आहे का? एसआयटी तपासाची गती वाढवत नसेल, तर अजून संशयाचे धुके वाढत जात आहे.
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आ. रोहित पवार यांनी एक्सवर म्हटले आहे की, अजूनही पुढे न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढे येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *