नाशिकरोडला प्रतिबंधित गुटखा जप्त….. अन्न औषध विभागाची कारवाई…….
नाशिकरोड देवळाली गावातील राजवाडा भागातील सिद्धार्थ नगर येथील मे. अथर्व जनरल स्टोअर्स या दुकानावर नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात ६१ हजार ६३५ रुपये किमतीचा तंबाखूजन्य प्रतिबंधित पदार्थांचा साठा विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
अन्न सुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मे. अथर्व जनरल स्टोअर्स या दुकानात राज्यात विक्री, साठा, उत्पादन आणि वितरणास प्रतिबंधित असणारा तंबाखूजन्य अन्नपदार्थाचा साठा विक्रीसाठी आणण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन आणि पी.एस.पाटील, यु.आर. सूर्यवंशी यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास नाशिकरोड पोलीस पथकाच्या बंदोबस्तात मे. अथर्व जनरल स्टोअर्स या दुकानावर छापा टाकला असता या दुकानात निलेश भालेराव या संशयिताने विविध प्रकारचा प्रतिबंधित आणि आरोग्यास अपायकारक असलेला तंबाखूजन्य अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवून ठेवलेला मिळून आला. हा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा निलेश भालेराव याने मे. पंचवटी ट्रेडर्स या दुकानाचा मालक राहील शेख याच्याकडून खरेदी केल्याची कबुली कारवाई पथकाला दिली. अन्न सुरक्षा अधिका-यांनी हा संपूर्ण प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अथर्व जनरल स्टोअर्स या दुकानाचा मालक निलेश राजेंद्र भालेराव रा. सिद्धार्थ नगर, राजवाडा देवळाली गाव याच्यासह हा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा ज्या दुकानातून खरेदी करून आणण्यात आला ते मे. पंचवटी ट्रेडर्स या दुकानाचा मालक राहील शेख यांच्या विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.