नाशिकरोडला गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहनांना बंदी करण्याची पीपल्स रिपाइंची मागणी
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता नाशिकरोड, जेलरोड या भागातील अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन करून – संभाव्य अपघात टाळावेत यासंदर्भात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या शिष्टमंडळाने वाहतूक पोलीस निरीक्षक दिनकर कदम यांची भेट घेऊन निवेदन दिले.
नाशिकरोड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, स्टेशन रोड, बिटको सर्कल, नांदूर नाका, जेलरोड या भागांत अवजड वाहनांना त्वरित बंदी करण्यात यावी जेणेकरून सणांच्या पार्श्वभूमीवर होणारी वाहतूक कोंडी आणि मोठ्या प्रमाणत होणारे अपघात व जीवितहानी यावर नियंत्रण मिळविता येईल. यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांना निवेदनद्वरे मागणी करण्यात आली आहे.
येत्या काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. यामुळे शहरातील विविध बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे अवजड वाहतूक बंद केल्यास वेळोवेळी होणारी वाहतुकीची कोंडी कमी होईल. जेलरोड रस्त्यावर फटाके विक्रीचे स्टॉल लावले जातात. अनेक नागरिक रस्त्यावर वाहने उभी करून खरेदीसाठी जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याचे दिसून येते. यातून अनेक वादाचे प्रसंग उद्भवतात. वाहतूक पोलिसांनी याची दखल घेऊन वेळीच योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. वाहतुकीचा अडथळा झाल्यास रुग्णवाहिका अथवा इतर आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक सेवा हवी असल्यास त्यात अडथळा येऊन एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. याची प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी पीआरपीचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे, जिल्हाध्यक्ष शशी उन्हवणे, राज निकाळे, नादेश समदूर, गजानन मगर, दीपक सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.