नाशिकरोडला झुलेलाल जयंती निमित्त भव्य मिरवणूक….. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन….. राम साधवानी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न……
सिंधी बांधवांचे कुळदैवत वरुण देव भगवान पूज्य झुलेलाल अवतरण दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार असून त्यानिमित्ताने नाशिकरोडला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 30 मार्च रोजी साजरी होणाऱ्या जयंती निमित्त कलानगर येथील पूज्य झुलेलाल ध्यान मंदिरात श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम साधवानी यांच्या अध्यक्षतेखाली मंगलवार 25 फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली. पूज्य झुलेलाल अवतरण महोत्सव 30 मार्च रोजी सकाळी पूज्य बहराना साहेब पूजा, रक्तदान शिबिर, श्री शारदा शरणम् सत्संग, दुपारी सिंधी धार्मिक गीतांचा कार्यक्रम, सायंकाळी पूज्य झुलेलाल ध्यान मंदिरापासून जेलरोड, बिटको, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, वास्को चौक, जयराम हॉस्पिटल रोड, बिटको नगर पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
कोरोना काळात आणि त्यानंतरच्या वर्षात मिरवणूक काढण्यात आली नाही मात्र आता यावर्षी भाविकांच्या आग्रहानंतर भव्य मिरवणूक निघणार असल्याने समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जयंती साजरी होण्यासाठी पूजा मनीष भोजनानी दीपक तोलानी, रक्तदान शिबिर हरीश देवानी, मंडप हरीराम देवानी, महाप्रसाद सुंदरदास रामचंदाणी, मिरवणूक दिनेश दासवानी, दिनेश साधवानी आदींना भाविकांना जयंतीची सेवा देण्यात आली आहे.
भाविकांनी कार्यक्रमांना आणि मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन सेवेचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष राम साधवानी यांनी केले आहे. पूज्य झुलेलाल भगवान जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरी होणार असून यादिवशी सिंधी समाज बांधवांची सर्व दुकाने आस्थापने बंद राहणार आहेत.
यावेळी चॅरिटेबल ट्रस्टचे हरीराम देवानी, मनीष भोजनानी, दीपक तोलानी, सुरेश सुंदरानी सह भगवान कारडा, जगदीश रामनानी, नरेश कारडा, सुन्दरदास रामचंदानी, दिनेश दासवानी, दिनेश साधवानी, नितीन कारडा, गिरीश आहुजा, भरत साधवानी,धर्मा आहुजा, बंटी दासवानी, गिरीश नंदवानी आदी भाविक उपस्थित होते.