सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य….. झुलेलाल मंदिराची बदनामी….. नाशिकरोड पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल…..
सिंधी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य आणि झुलेलाल मंदिराची बदनामी करणाऱ्या विरोधात एका व्यक्ती विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ऑक्टोबर रोजी कलानगर जेल रोड येथील झुलेलाल मंदिरात आमदार निधीतून ५० लाखांचा विकास निधी उपलब्ध झाल्याने भूमिपूजन कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते. सदर भूमिपूजन कार्यक्रमाची बातमी ११ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रकाश ताजनपुरे यांनी प्रसिद्ध बातमीत टिप्पणी करून सिंधी समाज बांधवांच्या आणि झुलेलाल मंदिराची बदनामी होईल अशा प्रकारे अपमानजनक टिप्पणी केली होती. टिप्पणी वाचल्यानंतर सिंधी समाज बांधवांमध्ये नाराजी आणि रोष पसरला होता.
सिंधी बांधवांच्या झुलेलाल मंदिराला आमदार निधीतून ५० लाखांचा निधी का मिळतो, मंदिरात रात्री १२ वाजेपर्यंत नंगानाच होतो, भोंगे सुरू असतात आदी वादग्रस्त स्वरूपाच्या टिप्पणी करत सोशल मीडियावर समाजाची बदनामी केली होती. संशयित प्रकाश ताजनपुरेनी सिंधी समाजाबाबत वादग्रस्त टिप्पणी करत समाजाच्या भावना दुखावल्या असल्याबाबत तक्रार करीत हरीराम देवानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश ताजनपुरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उप निरीक्षक सुनील बीडकर करीत आहेत.