गोडसेंचा पाटीलांवर गंभीर आरोप: “जयंत पाटील यांनीच आमचं नुकसान केलं”
नाशिक पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (शरद पवार गट) उमेदवारी मिळण्याची पूर्ण शाश्वती असलेले प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांचे नाव शेवटच्या क्षणी रद्द होऊन भाजपमधून आलेल्या गणेश गिते यांना उमेदवारी देण्यात आल्याने कामगार, कष्टकरी, शेतकरी, सामन्य वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. माझ्यासारख्या निष्ठांवताला पक्षाने उमेदवारी नाकारल्याने शरद पवारांवरील निष्ठा हरली आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पैशाची ताकद जिंकली, अशी उद्विग्न प्रतिक्रिया जगदीश गोडसे यांनी व्यक्त केली आहे. तथापी, आपण अजिबात हार मानलेली नसून विधानसभेसाठी अपक्ष म्हणून निवडणुक लढविणार आहोत, समर्थकांनी तयारीत रहावे, असे नमूद करून जनतेच्या दरबारात आपल्याला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक रोडच्या आयएसपी, सीएनपी या प्रेसचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढविणा-या गोडसे यांच्या नेतृत्वाखाली कामगार पॅनलने गेल्या २०१२ पासून प्रेसमध्ये एकहाती सत्ता राखली आहे. प्रेस मयत कामगारांच्या वारसांची नियुक्ती, सातवा वेतन आयोग, रिटायमेंट मेडिकल पॉलिसी आदी महत्वाचे प्रश्न गोडसे यांनी मार्गी लावले. नोटबंदी आणि कोव्हिड काळात त्यांच्या नेतृत्वाखाली प्रेस कामगारांनी अविरत मेहनत घेत प्रेसचे उत्पादन सुरु ठेवले होते. प्रेस कामागारांचे, जनतेचे अनेक प्रश्न गोडसे यांनी सोडविले आहेत. नोटबंदीत प्रेस कामगारांनी वर्षभर सुटी न घेता रात्रंदिवस काम करून नोट टंचाई दूर केली होती. या योगदानाबद्दल गोडसे आणि त्यांच्या सहका-यांचा पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नवी दिल्लीत सत्कार करण्यात आला होता.
प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय युनिग्लोबल कामगार संघटनेवर उपाध्यक्ष निवड झालेल्या जगदीश गोडसे यांनी विधानसभेची निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी दोन वर्षांपासून केली होती. त्यासाठी मतदार संघात व्यापक दौरे घेत विविध मेळावे, उपक्रम राबवविले होते. मतदारसंघ पिंजून काढला होता. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रेस जिमखाना येथे हिंद मजदूर सभेचा अमृतमहोत्सव कार्यक्रम गोडसे यांनी घेतला. शरद पवार कृषीमंत्री, मुख्यमंत्री झाले, त्यांचा वाढदिवस यांच्या तारखा असलेल्या नोटा देऊन सत्कार केला होता. शरद पवार यांनीही त्यांच्या कार्याची दखल घेतली. गोडसे यांच्या घराच्या वास्तुशांतीला आवर्जून हजेरी लावली होती. त्यामुळे गोडसे यांची उमेदवारी निश्चित समजली जात होती.
गोडसे यांनी पवारांशी चांगला संपर्क ठेवला होता. पवार यांनीही गोडसे यांना नाशिक पूर्वमधून उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते. तसे स्पष्ट संकेत देत मतदार संघात कामाला लागण्याचे निर्देश दिले होते. गोडसे यांनी दोन वर्षापासून कामांचा, मेळाव्यांचा, कार्यक्रमांचा धडाका लावला होता. त्यांची उमेदवारी निश्चित झालेली असतानाच शेवटच्या क्षणी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या गणेश गीते यांना उमेदवारी देण्यात आल्याने प्रेस कामगार, शेतकरी, कष्टकरी यांना जबर धक्का बसला. जगदीश गोडसे यांनीच राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी करावी, त्यांना आम्ही विजयी करून देऊ, अशी हमी नागरिकांनी दिली आहे.
निष्ठा हरली, पैसा जिंकला
जगदीश गोडसे म्हणाले की, माझी शरद पवार आणि पक्षावर अजूनही निष्ठा आहे. मात्र, शेवटच्या क्षणी झालेल्या घडामोडीमुळे प्रामाणिक निष्ठा हरली आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पैशाची ताकद जिंकली, असे मला खेदाने नमूद करावेसे वाटते. मी पवार साहेबांची मुंबईत भेट घेतली तेव्हा पक्षाच्या उमेदवारीचा एबी फार्म जगदीश गोडसे यांनाच देऊन टाका, अशी स्पष्ट सूचना शरद पवार यांनी जयंत पाटील यांना सर्वांसमक्ष केली होती. मात्र, त्यांचा आदेश झिडकारून दुस-यालाच उमेदवारी देण्यात आली. यावरून पैशाची ताकद चालली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तथापी, समर्थकांनी निराश होऊ नये. मी अपक्ष म्हणून विधानसभा निवडून लढणार असून अन्यायाचा प्रतिकार करणार आहे. जनता मला नक्कीच विजयी करेल, असा विश्वास आहे.