एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक……
नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या शिवाजीनगर येथील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा चोरट्यांना उपनगर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजद्वारे अटक केली आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या शिवाजीनगर येथे एसबीआय बँक शाखेच्या एटीएम ए टी एम मध्ये २६ ऑगस्ट रोजी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास दोघे जणांनी आत घुसून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. चोरी करत असताना अचानकपणे कोणीतरी येत असल्याचा सुगावा लागल्याने दोघांनी तेथून पळ काढला.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी यासंदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आदींनी भेट देऊन पाहणी केली. दोन्ही चोरांच्या तोंडाला रुमाल लावलेला असल्याने पोलिसांना चेहरा ओळखणे
मुश्किल होत होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, जयंत शिरसाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी यांनी व त्यांचे सहकारी विशाल सपकाळे, सुरेश गवळी, हवालदार विनोद लखन, इमरान शेख, सौरभ लोंढे, जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, पंकज करपे, सूरज गवळी, सुनील गायकवाड, संदेश रगतवान आदींनी परिसरात ठिकठिकाणी शोध घेऊन सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले. संशयित चोरट्यांचा मार्ग शोधून काढला. त्यातील एक जण हा वॉचमन म्हणून ड्युटी करत असल्याचे समजल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला खाली दाखवताच आपण आपल्या साथीदारासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. संशयित विवेक कुमार व अनिल कुमार असे दोन्ही चोरांची नावे आहेत.