मनोहर कारडा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकारांविरोधात गुन्हा दाखल…… अशोक कटारिया सह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल……
नाशिकरोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांचे बंधू मनोहर कारडा यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सहा सावकारांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ सावकारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पत्नी भारती कारडा यांनी उपनगर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात अर्ज दिले होते. अर्जाची चौकशी होऊन उपनगर पोलिस ठाण्यात तूर्तास अशोक मोतीलाल कटारिया, ज्ञान खत्री, कुलजित सिंग जोहर, प्रकाश चावला, आशिष राठोड, सन्नी सलूजा यांच्यावर भा. द. वि कलम ३०६, ३८६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोहर कारडा यांनी २ नोव्हेंबर २०२३ रोजी संसारी रेल्वे गेट जवळ मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. फसवणूक प्रकरणात मनोहर कारडा यांचेही नाव असल्याने ते अत्यंत मानसिक तणावाखाली असल्याने आत्महत्या केल्याची चर्चा होती.दिवंगत मनोहर कारडा यांची पत्नी भारती कारडा यांना काही दिवसांपूर्वी घरात साफसफाई करीत असताना दिवंगत पती मनोहर कारडा यांची डायरी त्यांना सापडली. डायरी वाचत असताना भारती कारडा यांना मनोहर कारडा यांनी १९ सावकारांनी दिलेल्या मानसिक त्रास आणि जाचामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख डायरी मध्ये लिहलेले दिसून आल्याने धक्काच बसला होता.
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या १९ जणांचे नाव डायरी मध्ये असल्याची माहिती दिवंगत मनोहर कारडा यांच्या सुसाईड नोट मध्ये नमूद आहे. या १९ व्यक्तींनी आम्हाला आर्थिक व्यवहारात अव्याच्या – सव्या दराने व्याज वसूल करीत आम्हाला मानसिक त्रास दिला आहे आणि त्यांच्या जाचाला कंटाळून मनोहर कारडा यांनी आत्महत्या केली असल्याचा उल्लेख पत्नी भारती कारडा यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या अर्जात आहे.
मनोहर कारडा यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सर्व १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला होता.या सावकारांकडून माझ्या परिवारास संपवण्याच्या हि धमक्या दिल्या जात असून त्यांच्या वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून माझ्या परिवारातील अजून कोणी असेच पाऊल उचलतील याची शक्यता नाकारता येत नाही असे आरोप दिवंगत मनोहर कारडा यांची पत्नी भारती कारडा यांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात आहे. तूर्तास अशोक कटारिया, ज्ञान खत्री, कुलजित सिंग जोहर, प्रकाश चावला, आशुतोष राठोड, सन्नी सलूजा या सहा जणांचे नावे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासात इतरांचे नावे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील अशी माहिती उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी दिली. अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.