फटाके उडवण्याचा वादातून युवकाचा खून……एक जण ताब्यात दोन फरार…..
राज्यात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना सर्वजण दिवाळीच्या धामधुमित नाशिकमध्ये फटाके उडवण्याच्या वादातून एका २८ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. हत्येच्या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या पाथर्डी गावात फटाके उडवण्याच्या वादातून मंगळवारी रात्री गौरव अखाडे या २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. पाथर्डी गावात स्वराज्य नगर येथे लक्ष्मपूजनाच्या दिवशी मयत गौरवच्या घराबाहेर शेजारी राहणारे शिंदे कुटुंबीय फटाके फोडत होते. लहान मुले डचकतात म्हणून त्यांनी फटाके मैदानात
फोडण्यास सांगितले. तेव्हा काही युवकांशी फटाके उडवण्यावरून वाद झाले होते. मंगळवारी पुन्हा त्यांच्यात बाचाबाची झाली. यातील संशयित बबनराव यादवराव शिंदे, नारायण बबनराव शिंदे यांनी रागाच्या भरात त्याच्यावर धारधार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात तो मयत झाला. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ संशयित अजून फरार असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. हत्येच्या घटनेत पोलिसांकडून एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सध्या सुरू आहे.