जयभवानी रोडवर फिरणारा बिबट्या अखेर जेरबंद……
नाशिकरोड भागातील जय भवानी रोड मनोहर गार्डन येथे डरकाळ्या फोडणारा बिबट्या अखेर गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पिंजऱ्यात अडकला. काही दिवसांपूर्वी याच भागात रात्री बिबट्याने एका पाळीव प्राणी फस्त केला होता. महिन्याभरापासून बिबट्या जय भवानी रोड येथे रात्री अपरात्री सतत फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. नागरिकांचे सकाळी रात्री पायी फिरणे बंद झाले होते, गाडीवर येताना जाताना सुद्धा कुठून तरी बिबट्या आपल्यावर हल्ला करेन अशी भीती मनात होती. वन विभागाने मनोहर गार्डन बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावला होता काल रात्री अखेर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
आर्तीलरी येथील भिंती लगतं असलेले चौहान मळा याठिकाणी बिबट्या पिंजऱ्यात पकडण्यात वन विभागाला यश आले. काल रात्री नागरिकांना बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या काही नागरिकांनी बघितले आणि वनविभागाला कळविले. मनोहर गार्डन चव्हाण मळा परिसरात अजून एक बिबट्या असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होती. पकडलेल्या बिबट्याला लांब जंगलात सोंडण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
महिन्याभरापूर्वी बिबट्याने कदम लॉन्स जवळ एका व्यक्तीवर हल्ला केला होता पण सुदैवाने तो वाचला, त्यानंतर सतत बिबट्या परिसरातील मनोहर गार्डन, अण्णा गणपती आणि इतर भागांमध्ये दिसत असल्याने नागरिकांनी वनविभागवर नाराजी व्यक्त केली होती पण अखेर वनविभागाच्या प्रयत्नांना यश येऊन गुरुवारी रात्री ११ वाजे दरम्यान बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात यश आले. बिबट्या पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली. माहिती मिळताच उपनगर पोलिस दाखल झाले. वनविभागाच्या प्रयत्नांना यश आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.