लासलगाव-विंचूर सह सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्ती कामाला अखेर सुरुवात झाली आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधार्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असतानाही केवळ पाईपलाईन नादुरुस्त असल्याच्या कारणाने पाणीपुरवठा वितरणावर मोठा परिणाम झाला होता. अखेर हे काम सुरू झाल्याने लासलगाव व सोळा गाव परिसरातील नागरिकांची पाण्यापासून होणारी वणवण कायमची थांबणार आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून सुरुवातीला लासलगाव-विंचूर सह सोळा गाव पाणी योजनेच्या दुरुस्ती करिता 13 कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र दर वाढल्याने पुन्हा निविदा प्रसिद्ध करावी लागल्याने अखेर 20 कोटी रुपये त्यासाठी मंजूर झाले होते.
धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात असतानाही पाईपलाईन जागोजागी फुटत असल्याने पाणीपुरवठा वितरणावर विपरीत परिणाम झाला होता. परिणामी लासलगाव-विंचूर सह परिसरातील गावांमध्ये तब्बल 25 ते 30 दिवस उशिराने पाणीपुरवठा प्रशासनाला करावा लागत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
परिणामी पाणी मिळण्यासाठी नागरिकांना उपोषण , आंदोलने करावी लागली होती. गत निवडणुकीत पाणीप्रश्न डोळ्यासमोर ठेवत निवडणुका लढल्या गेल्या होत्या. अखेर आता हे काम पूर्णत्वास जाणार असल्याने पाण्यासाठी होणारे राजकारण तात्पुरते तरी थांबणार आहे. बुधवार पासून या दुरुस्ती कामास सुरुवात झाली असून गुजरात राज्यातून नांदूरमध्यमेश्वर बंधारा परिसरात मोठ्या संख्येने पाईप आणण्यात आले आहे या पाईपचे पूजन सोळा गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष, मुंबई बाजार समितीचे संचालक, सरपंच जयदत्त होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी, ठेकेदार काळे, उपसरपंच रामनाथ शेजवळ, अफजल शेख, विंचूर सरपंच सचिन दरेकर, अनिल विंचूरकर, सोळा गाव समितीचे सचिव, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील,प्रफुल्ल कुलकर्णी, पवन सानप, मयूर राऊत आदींसह मान्यवर उपस्थित होते. नांदूरमध्यमेश्वर धरण परिसरात हे पाईप उतरविण्यात आले असून क्रेन व पोकलेन च्या आधारे युद्ध पातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.