सोन साखळी चोरांचा उच्छाद….. घराच्या गेटपर्यंत सोनसाखळी चोरट्यांची गेली मजल….
नाशिक शहरात गुन्हेगारी कळस गाठला असुन सोनसाखळी चोरांनी तर उच्छादाच मांडला आहे. रामवाडी परिसरात पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून एक महिलेची चैन चोरण्याचा प्रकार घडला होता. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता नाशिकरोड आर्टिलरी सेंटर रोड येथील गोपाल नगर आराधना इनक्लेव याठिकाणी सौ. लता महेंद्र शर्मा (पप्पू शेठ शर्मा) घराच्या गेट जवळ उभ्या होत्या.

दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी शर्मा यांना साहेबांनी तुम्हाला बोलविले आहे तुम्हाला ऐकू येत नाही का? असे दरडावून सांगितले. त्यामुळे शर्मा घराजवळच त्याठिकाणी गेले असता तिथे दुचाकीवर अजून दोन जण उभे होते. त्यांनी शर्मा यांना आजकाल सोने चोरीचे प्रकार वाढले आहेत तुम्ही असे सोने घालून का फिरत आहात म्हणत त्यांना सोने काढून ठेवण्यास सांगितले. शर्मा यांनी अंगावरील सोन्याचे दागिने काढून कागदात बांधून ठेवत असतांना असे बांधून ठेऊ नका सांगत आम्ही व्यवस्थित बांधून देतो म्हणत हात चलाखीने कागदाची पुडी बदलून दुसरी पुडी शर्मा यांना देऊन निघून गेले.

शर्मा या घराच्या गेट जवळ येऊन कागदाची पुडी उघडून बघितल्यावर त्यांना लुबाडल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी सव्वा तोळ्याची चेन आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी असा अंदाजे दीड लाख रुपयांचे सोने लुबाडल्याचे लक्षात आले.
पत्नीने घडलेला प्रकार सांगताच पती पप्पू शर्मा यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. उपनगर पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. लुबाडल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

