जळगाव येथून दहा मोटारसायकली हस्तगत; उपनगर पोलिसांची कौतुकास्पद कारवाई
विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या ६ लाख ७० हजार रुपये किमतीच्या दहा मोटारसायकली सह २ संशयितांना जळगाव येथून ताब्यात घेण्यात उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.
उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार गेल्या ७ जुलैला जेलरोड येथील पेंढारकर कॉलनीतून एक दुचाकी चोरीस गेल्याप्रकारानी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरु होता.
नासिक शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे आणि बाबासाहेब दुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली होती. पोलीस शिपाई जयंत शिंदे आणि गौरव गवळी यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची माहिती मिळवली.संशयित हे जळगाव जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले.
तसेच खबऱ्यांमार्फतही माहिती मिळाली होती.
त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस शिपाई सुरज गवळी, पोलीस शिपाई जयंत शिंदे हे खात्री करण्यासाठी जळगाव येथे पोहचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने एमआयडीसी येथील सुप्रीम कॉलनीतून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या भागातून दहा मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. अजय शंकर चव्हाण (वय-२९) आणि उत्तम प्रेमा पवार (वय -३२) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांनी ६ लाख ७० हजार रुपयांच्या चोरलेल्या मोटारसायकली ह्या उपनगर, पिंपळ्गावगाव बसवंत, चोपडा, जळगाव, जामनेर, औरंगाबाद, बऱ्हाणपूर येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी आणि सहाय्यक राहुल जाधव करीत आहेत.