समाजसेवक कन्हैयालाल आलठक्कर (कन्नु शेठ) यांचे निधन…….. लढवय्या नेता हरपला……. अंत्ययात्रा दुपारी १२.३० वाजता…….
नाशिकरोड येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, राजकीय नेते, तसेच सामाजिक कार्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलेले कन्हैयालाल आलठक्कर यांचे दिर्घ आजाराने वयाच्या ६६ व्या वर्षी सोमवार २४ जुन रोजी निधन झाले. आलठक्कर परिवारातर्फे दरवर्षी प्रमाणे पळसे येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात पायी जाणाऱ्या निवृत्ती नाथांच्या पालखीचे वारकऱ्यांसाठी दरवर्षी अन्नदान वाटपाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. कन्हैयालाल आलठक्कर यांना हॉस्पिटलमधुन शनिवारीच डॉक्टरांनी त्यांना घरी पाठवून सेवा करण्यास सांगितले होते पण दृढ इच्छाशक्ती असल्याने सोमवारी भाविकांच्या हस्ते पळसे येथे पालखीची शुभ आरती व अन्नदानाचे पवित्र कार्य संपन्न झाल्यानंतर कन्हैयालाल आलठक्कर यांनी इहलोकाचा निरोप घेत वैकुंठवासी झाले.
कन्हैयालाल यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, सहकार आणि व्यावसायिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. कन्हैयालाल आलठक्कर हे कन्नु शेठ म्हणून प्रसिद्ध होते. कन्नु शेठ यांचे दातृत्व वाखाणण्याजोगे होते.आलठक्कर परिवार हा अत्यंत शांत, धार्मिक विचारांनी संस्कारीत परिवार आहे.
गावाच्या हरिनाम सप्ताहात ते हिरीरीने भाग घेत. शिखरेवाडी येथील मैदानावर त्यांनी ह.भ.प. रामरावजी ढोक महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन केले होते. धार्मिक संस्काराचा वारसा लाभलेल्या परिवारातील कन्नु शेठ विविध सामाजिक कार्यात अग्रेसर होते. पळसे येथील विठ्ठल रुखमाई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ते सतत करीत असत. नाशिकरोड येथील झुलेलाल पतसंस्था पूर्वपदावर यावी यासाठी कन्नु शेठ यांनी प्रशासक काळात चेअरमनपदी राहून अहोरात्र कठोर परिश्रम घेतले होते. कन्नु शेठ यांच्या मार्फत दरवर्षी सामुहिक विवाहाचे आयोजन करण्यात येत असे. ज्यामध्ये शेकडो जोडप्यांचे विवाह करण्यात येत होते. काँग्रेस पक्षात राहून राजकीय क्षेत्रात कन्नु शेठ यांनी भरीव सामाजिक उपक्रम राबविले. समाज उपयोगी विविध उपक्रम तसेच बैल पोळा सारखे सण ते साजरे करत.
कन्नु शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हैयालाल आलठक्कर विचार मंचच्या माध्यमातून युवक विविध उपक्रम राबवत.नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूकही कन्नु शेठ यांनी लढविली होती. लढवय्या नेता कन्नु शेठ यांच्या निधनाने सिंधी समाजात एक पोकळी निर्माण झाली असून त्यांची पोकळी कुणीच भरून काढणार नाही. कन्नु शेठ यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, भाऊ, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. एक हरहुन्नरी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले कन्नु शेठ सिंधी समाजाबरोबरच बहुजन समाजाशीही एकरूप झालेले होते. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी दुपारी १२.३० वाजता त्यांच्या निवासस्थानापासुन लक्ष्मी कृपा, मोटवानी रोड, उत्सव मंगल कार्यालय शेजारी, नाशिकरोड येथून निघणार आहे. देवळाली गाव अमरधाम, वालदेवी नदी तीरावर दुपारी १ वाजता त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.